गोंदिया : महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रभावीत होऊन दलम सदस्य जहाल माओवादी वर्गेश उर्फ कोसा मंगलू उईका (२६,रा.रा. बेदरे, पो.स्टे. जगरगुंडा) याने गोंदिया पोलिसांसमोर सोमवारी (दि.१०) आत्मसमर्पण केले. वर्गेशवर ३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो लहानपणापासूनच नक्षल चळवळीत सहभागी होता.
माओवादी संघटनेत होणारा त्रास व अत्याचारास कंटाळून वर्गेशने सोमवारी जिल्हाधिकारी प्रजित नायर व पोलिस अधीक्षक गोरख भामरे, यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित माओवादी वर्गेश उर्फ कोसा याचे मूळ गाव सुकमा जिल्ह्यातील अति नक्षलप्रभावित भागात असल्याने त्याच्या गावात पूर्वीपासूनच सशस्त्र गणवेशधारी माओवाद्यांचे येणे-जाणे होते. माओवाद्यांच्या भुलथापा व प्रलोभनांना बळी पडून त्यांच्या निर्देशाप्रमाणे लहानपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी होऊन बाल संघटनेमध्ये काम करीत होता. परंतु, नक्षल चळवळीच्या नावाखाली वरिष्ठ कंमानडरची चाललेली मनमानी, फंडच्या नावाखाली चाललेली पैशांची लुटमार, खोटी ध्येय-धोरणे, भुलथापा, प्रलोभने, हिंसा या सर्व बाबींचा खरा चेहरा-मोहरासमोर आल्यानंतर त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
सन 2016 मध्ये दलमची सदस्यता
वर्गेश लहानपणापासूनच नक्षल चळवळीत सहभागी होऊन बाल संघटनेत काम करीत होता. मात्र सप्टेंबर २०१६ मध्ये जगरगुंडा दलममध्ये भरती झाला. जगरगुंडा एरियामध्ये त्याला एक महिन्याची बेसिक ट्रेनिंग देण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण गडचिरोली डिव्हिजनमधील भामरागड एरिया कमिटीच्या पीएल-७ मध्ये पाठविण्यात आले. तेथे जवळपास दोन महिने त्याने काम केले. त्यानंतर माहे जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत गट्टा दलम सोबत काम केले. त्यानंतर त्याला फेब्रुवारी २०२० मध्ये भामरागड एरीयामध्ये पाठविण्यात आले. एप्रिल २०२१ पर्यंत भामरागड दलम व सीएनएम (चेतना नाट्य मंच) येथे त्याने दलम सदस्य या पदावर काम केले आहे.






