गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी निवडणूक प्रक्रियेची माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक (सामान्य) मोहित बुंदास, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवडणूक निर्णय अधिकारी गोंदिया चंद्रभान खंडाईत यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 लाख 25 हजार 100 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 53 हजार 685 पुरुष मतदार आहेत तर 5 लाख 71 हजार 405 स्त्री मतदार असून इतर 10 मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्यात निवडणूक लढविणारे उमेदवार 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ- 19, 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघ- 21, 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघ- 15 व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघ- 09, असे एकूण 64 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण 1285 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार व 85 वर्ष अधिक वयोगटातील मतदारांकरीता मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सेनादलातील मतदारांची संख्या (Service Voter) 1972 आहे. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध यंत्रणांच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 10 आंतरराज्यीय चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आले आहे. सदर निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन कार्यरत आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. सुजान नागरिकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी सांगितले.
64 उमेदवार निवडणूक रिंगणात, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी प्रजित नायर
RELATED ARTICLES