गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (मनरेगा) उद्देश मजुरांना कामाची हमी देण्याचा असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ही कामं यंत्राच्या मदतीने केली जात असल्याचे धक्कादायक चित्र उघड होत आहे.गट ग्रामपंचायत सावरटोला अंतर्गत उमरी येथील दोन्ही तलाव यंत्राच्या साह्याने खोद काम व बांधकाम केले जात आहे.यामुळे हजारो मजुरांना रोजगाराच्या संधींपासून वंचित रहावं लागत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी याच तलावाची कामे रोजगार हमी योजनेत केल्या गेली होती. त्यामुळे चापटी, उमरी, सावरटोला या गावातील मजुरांना रोजगार मिळाला होता.हे येथे उल्लेखनीय आहे.
रस्ते, पाणंद, चर खोदाई, लहान बोड्या,तलाव यांसारखी कामं ही योजने अंतर्गत मानवी श्रमावर आधारित असावी.अशी अट असूनही, मग आताच लघु पाटबंधारे विभागामार्फत अनेक ठिकाणी खाजगी ठेकेदारांकडून जेसीबी, ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचा वापर का केला जात आहे? असा प्रश्न स्थानिक मजुरांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे कामे झपाट्याने पूर्ण होतात,पण मनरेगांच्या उद्दिष्टांना हरताळ फासले जात आहे.ग्रामस्थांच्या हाताला काम मिळत नाही.त्यामुळे ग्रामीण शेतकरी शेतमजुर, मजूर हे बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे राज्यात इतरत्र व राज्याबाहेर स्थानिक मजुरांना कामासाठी भटकावे लागत आहे. यंत्र काम करतात, आणि आम्ही फक्त बघत बसतो. मग सरकारनं ही योजना कशासाठी सुरू केली? असा सवाल अनेक ठिकाणच्या मजुरांनी उपस्थित केला आहे. ही बाब फक्त नियमभंग नाही, तर गरिबांच्या हक्काचं शोषण आहे, असा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. शासनाने ग्रामीण भागातील गरिबांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत वर्षातून किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात ही हमी केवळ कागदावरच उरली आहे. येथे व परिसरातील हजारो मजूरांना अपेक्षित १०० दिवसांचे काम मिळालेले नाही.त्यामुळे इतर मुलांसाठी असलेल्या योजनांपासून मजुरांना वंचित राहावे लागते.
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे ठप्प असल्यामुळे हजारो मजुरांना कामाविना दिवस काढावे लागत आहेत.कामाची हमी देणारी ही योजना सध्या कागदोपत्रीच उरली असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे स्थानिक मजुरांचे बाहेर स्थलांतरही वाढत आहे. प्रशासनाकडून यावर दुर्लक्ष होत असल्याने, ही योजना यंत्रसामर्थ्यावर चालू असून माणूस मागे पडतो आहे. त्यामुळे रोजी व रोजगारासाठी स्थानिकांना बाहेर जाण्याची पाळी येते की काय?अशी शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित अधिकार्यांनी वेळेत कारवाई करून ही कामं केवळ मानवी श्रमातूनच पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची मागणी परिसरात मजुरांकडून सर्वत्र होत आहे.
कोट…
माजी मालगुजारी तलाव पुनर्जीवन योजना अंतर्गत हे काम केले जात आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताने न करता, यंत्रामार्फत केले जात आहे हे काम रोजगार हमी योजनेमार्फत नाही.
-अभिजीत दहिवले कनिष्ठ अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग अर्जुनी मोरगाव.