गोंदिया. मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांतील शेतकरी संकटात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे धान, सोयाबीन, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री मा. इंद्रनील नाईक यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत (नुकसानभरपाई) देण्याची मागणी केली आहे.
भेंडारकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. “धान आणि सोयाबीन ही प्रमुख पिके पूर्णपणे भिजून गेली आहेत. अनेक ठिकाणी भाजीपाला आणि फळबागांचे उत्पादन नष्ट झाले असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, अनेकांना शेती पुन्हा उभी करण्याचीदेखील क्षमता उरलेली नाही,” असे त्यांनी नमूद केले.
भेंडारकर यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्रांतील पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना वाढीव दराने नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, त्यांना धान विक्रीवरील आधारभूत हमीभाव किंवा बोनस मिळविण्यास प्रतिबंध करणाऱ्या जुन्या शासन अटी शिथिल करण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, “शासनाने तातडीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान योग्य प्रकारे नोंदवावे, पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करावेत आणि एकही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहू नये. शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात शासनाने त्यांच्यासोबत उभे राहणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.” जिल्ह्यातील शेतकरी सध्या आपल्या पिकांचे अवशेष वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी शेतातील पाणी अजूनही ओसरलेले नाही. कृषी विभागाचे अधिकारी नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेत आहेत. लवकरच पंचनामे सुरू होतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. निवेदन देतांना सुरेश हर्षे उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, डॉ लक्ष्मण भगत सभापती अर्थ व बांधकाम, चेतन वडगाये पंचायत समिती सभापती सडक अर्जुनी, आम्रपाली डोंगरवार सभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, यशवंत गणवीर जिल्हा परिषद सदस्य, कविता रंगारी जिल्हा परिषद सदस्य, संदीप कापगते उपसभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव, निशा काशिवार उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव, देवरी, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोंदिया, गोरेगाव या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले असून, जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा शासनाच्या मदतीकडे आशेने पाहत आहेत.
जिपरिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन
RELATED ARTICLES






