गोंदिया : तिरोडा तालुक्यातील पीएमश्री उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येथे शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यास ग्रहण करण्याची अडचण निर्माण झाली आहे. एकंदरीत या शाळेत ३१० विद्यार्थी आहेत. पंधरवाड्यापूर्वी कार्यरत चार शिक्षकांची बदली झाल्याने शाळेत एक मुख्याध्यापक व तीन शिक्षणसेवक असे चारच शिक्षक राहिल्याने या विद्यार्थ्यांचा डोलारा त्यांच्या खांद्यावर आला आहे. परिणामी या प्रकाराने शाळेतील व्यवस्था पुर्णत: कोलमडली आहे.
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत पीएमश्री उच्च प्राथमिक शाळा बेरडीपार येते. शिक्षक विभागाच्या धोरणानुसार पटसंख्येच्या आधारावर शिक्षक देणे बंधनकारक आहे. या पुर्वी शाळेत मुख्याध्यापकासह एकूण १० शिक्षक कार्यरत होते. पंधरवाड्यापूर्वी शाळेतील चार शिक्षकांची बदली झाली असून वयोमानानुसार दोन शिक्षक सेवानिवृत्त झाले. परिणामी आता शाळेत फक्त चार शिक्षकच कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थांची वाढती पटसंख्या आणि वर्ग १ ली ते ८ वी वर्ग असून शिक्षक संख्या फारच कमी आहे. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अध्ययन करणे, तासिका घेणे तसेच शाळेतील इतर कामे करून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांवर पाहिजे तसा लक्ष देता येत नाही परिणामी शाळेची शैक्षणीक गुणवत्ता धासडण्याची शक्यता असून अनेक अडचणी निमार्ण होत आहे. सध्या स्थितीत शाळेतील विद्यार्थार्थांची शैक्षणिक, बौद्धिक आणि अभ्यासाची असलेली आवड पाहता शाळेचे वातावरण चांगले आहे. शाळेतील असलेली पटसंख्या आणि उपलब्ध शिक्षकांची स्थिती बघता शाळेत १० शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र शिक्षण विभागाने अफलातून कारभार करीत चार शिक्षकांची बदली केली. परिणामी ३१० विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा डोलारा फक्त चार शिक्षकांच्या खांद्यावर आला आहे. ही शिक्षण विभागाला माहित असूनही हा प्रकार केल्याने ग्रामवासीयांमध्ये कमालाची रोष निर्माण झाला आहे.
पटसंख्येच्या आधारावर शिक्षक द्या : सौ. पटले
शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या व शाळेतील भौतिक सुविधांचा विचार केल्यास विद्यार्थ्यांना चांगला अभ्यासक्रम या शाळेत मिळत आहे. मात्र शिक्षण विभागाने भविष्याचा विचार न करता शिक्षकांची बदली केली. परिणामी आजघडीला चार शिक्षकांवर शाळा सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. तेव्हा शिक्षण विभागाने पटसंख्येच्या आधारावर शिक्षक भरती करून ग्रामवासीयांना न्याय द्यावा. अशा मागणीचे निवेदन तिरोडा पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा पटले यांनी गटशिक्षणाधिकारी तिरोडा, शिक्षणाधिकारी गोंदिया व मुख्यमंत्री यांना दिले आहे.






