गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत राजनांदगाव ते कळमनादरम्यान तिसऱ्या लाइनचे काम प्रगतीपथावर आहे. राजनांदगाव ते कळमना या २२८ किमी अंतरावर तिसऱ्या लाइनचे निर्माण कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तिसऱ्या लाइनचे काम २० टक्के पूर्ण झाले असून, जानेवारी २०२६ मध्ये हे काम पूर्ण होऊन या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे रेल्वे गाड्यांना होणारा विलंब, परिणामी प्रवाशांना होणारा मनस्ताप कायमस्वरूपी दूर होणार आहे. नवीन वर्षांत रेल्वे प्रवाशांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरून दररोज ४५ वर एक्स्प्रेस, मेल गाड्चा, तर २० वर लोकल आणि पॅसेंजर गाड्या धावतात. तर, दररोज १० हजारांवर प्रवासी प्रवास करतात. गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांची सीमा लागून असल्याने या रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व आहे. कळमना ते राजनांदगाव या मार्गावर प्रवासी गाड्यांसह मालगाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात धावतात, मालवाहतुकीतून रेल्वेला सर्वाधिक महसूल देणारा हा विभाग आहे. मात्र, मालगाड्यांमुळे अनेकदा प्रवासी गाड्या आऊटवर, गुदमा आणि बोरतलावजवळ दोन ते तीन तास थांबवून ठेवल्या जातात. परिणामी प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचता येत नसल्याने त्यांचे प्रवासाचे वेळापत्रक बिघडून मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. या समस्येने गेल्या तीन चार वर्षांपासून या मार्गावरील प्रतासी चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप दूर करण्यासाठी आणि या मार्गावरील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे विभागाने राजनांदगाव ते कळमनादरम्यान २२८ किमीची तिसरी लाइन टाकण्याचे काम सुरू केले. यापैकी २५९ किमी रेल्वे लाइनचे काम पूर्ण झाले आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यास सुरुवात केली. आता केवळ दरेकसा ते सालेकसा यादरम्यानचे १० किमीचे काम शिल्लक आहे. हे काम जानेवारी २०२६ मध्ये पूर्ण होऊन फेब्रुवारीपासून तिसन्य लाइनवरून वाहतूक सुरू होणार आहे, त्यामुळे रेल्वे मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांना वेठीस धरण्याची वेळ येणार नाही. रेल्वे गाड्यांची गती वाढविण्यास मदत होईल. गाड्यांच्या लेटलतीफ कारभारापासून प्रवाशांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील प्रवाशांसाठी ही नवीन वर्षात एकप्रकारे भेट ठरणार आहे.
तिसऱ्या लाइनचे हे आहेत नेमके फायदे
तिसऱ्या लाइनमुळे कोळसा वाहतूक वाढेल, प्रवासी गाड्या अधिक गतिमान होतील, आऊटवर गाड्या थांबण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल, रेल्वे गाड्या वेळेत धावतील, परिणामी प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यास मदत होईल.
गोंदिया-डोंगरगड चौथ्या लाइनला हिरवी झेंडी
केंद्रीय मंत्रिमंडळ व रेल्वे बोर्डाने गोंदिया-डोंगरगडदरम्यान चौथ्या लाइनच्या कामाला ऑक्टोबर २०२५ मध्ये मंजुरी दिली. तसेच, यासाठी ३,४२५ कोटी रुपयांच्या निधीला सुद्धा मंजुरी दिली आहे. पाच वर्षात चौथ्या लाइनवे काम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्यास हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक अधिक जलद होणार आहे.






