गोंदिया : प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या समारंभाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ अंतर्गत गोंदिया जिल्हा सिकलसेल मुक्त करण्याचे आवाहन राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.
पालकमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, सिकलसेल अॅनिमिया हा आजार विशेषतः आदिवासी व ग्रामीण भागात गंभीर स्वरूप धारण करीत आहे. या आजाराचे वेळेवर निदान, समुपदेशन व उपचार केल्यास भविष्यातील पिढीला या आजारापासून मुक्त ठेवणे शक्य आहे. यासाठी शासनाच्या वतीने ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत असून, नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले.
या अभियानाअंतर्गत सिकलसेल तपासणी, जनजागृती, उपचार व समुपदेशन यावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाने तपासणी करून घ्यावी, युवक-युवतींनी विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व ओळखावे तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवी संस्थांचे या अभियानातील योगदानाबद्दल कौतुक केले. “सिकलसेल मुक्त गोंदिया” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या आरोग्यदायी, समृद्ध व सिकलसेल मुक्त भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
गोंदिया जिल्ह्याला सिकलसेल मुक्त करण्यासाठी ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया’ अभियानात सहभागी व्हा : पालकमंत्र्यांचे जिल्हावासीयांना आवाहन
RELATED ARTICLES






