गोंदिया : जिल्ह्यातील कचारगड येथे दिनांक 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत ‘महाकाली कंकाली कोपरलिंगा’ निमित्ताने यात्रा होणार आहे. या यात्रेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात. त्या ठिकाणी भाविकांची व त्यांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होते. आमगाव-सालेकसा-डोंगरगड या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात जड-अवजड मालवाहु वाहनांची वाहतुक होत असते. त्यामुळे जड-अवजड वाहनांपासून वाहतुकीची कोंडी होऊन गंभीर स्वरुपाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे यात्रेदरम्यान सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने, भाविकांच्या जिवितास धोका होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये आमगाव कडून डोंगरगडकडे जाणारे व डोंगरगडकडून आमगावकडे येणारे जड-अवजड मालवाहू वाहनांना दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता ते 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पुर्णत: बंद करण्यात येत असून जड-अवजड वाहनांना येण्या-जाण्यासाठी खालील प्रमाणे पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
असा राहील पर्यायी वाहतूक मार्ग
आमगाव-सालेकसा-डोंगरगडकडे जाणारी जड-अवजड वाहतुक पुर्णत: बंद करुन आमगाव-देवरी-डोंगरगड या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे. तसेच डोंगरगड-सालेकसा-आमगावकडे येणारी जड-अवजड वाहतुक पुर्णत: बंद करुन डोंगरगड-देवरी-आमगाव या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे. वरील आदेशाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी आवश्यक त्या ठिकाणी सूचनात्मक वाहतूक चिन्हे, बोर्ड लावून घ्यावेत. सदर अधिसूचना 30 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता ते 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता पर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.






