गोंदिया : देवरी तालुक्यातील शिरपूर येथील चेक पोस्टवर सुरू असलेल्या कथित अवैध वसुली प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर लाईव्ह ऑपरेशन करून या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार प्रशांत पडोळे यांनी शिरपूर चेक पोस्टवर अचानक धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. या कारवाईमुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीत चेक पोस्टवरील कर्मचारी आणि दलालांच्या माध्यमातून वाहनचालकांकडून बेकायदेशीररित्या पैसे उकळले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाहनांना अडवून परिसरातील धाब्यांवर नेऊन तथाकथित “वसुली ऑपरेशन टीम”द्वारे कार्डवरून मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप आहे.
खासदार प्रशांत पडोळे यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, “सामान्य नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांची लूट सहन केली जाणार नाही. दलालांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा गोरखधंदा सुरू असून, यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे,” असे सांगितले. या प्रकरणात स्थानिक चौकशी अपुरी ठरणार असल्याने निष्पक्ष आणि सखोल तपासासाठी त्यांनी CBI चौकशीची मागणी केली आहे. या अवैध वसुलीमुळे शासनाच्या यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितींमुळे प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून, दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.या प्रकरणात प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, दोषींवर कायदेशीर कारवाई होते का, याकडे संपूर्ण तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
शिरपूर चेक पोस्टवर खासदाराची अवैध वसुली विरोधात धडक कारवाई
RELATED ARTICLES






