गोंदिया : राष्ट्रिय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तब्बल 35 विविध राष्ट्रिय आरोग्य कार्यक्रम राबवुन लोकांना अविरत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. याच 35 विविध आरोग्य कार्यक्रम व उपक्रमांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकावला आहे.
डॉ. नितीन वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हा आरोग्य विभागाने उत्क्रृष्ट सांघिक कार्य व गाव पातळीवर केलेले सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकावला आहे. द्वितीय स्थानी रत्नागिरी जिल्हा तर तृतीय स्थानी वर्धा जिल्हाला सन्मानीत करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या राज्य पातळीवरील अधिकारांचे उपस्थितीत पुणे येथील दि. 5 जुलै रोजी राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. याच बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्याला प्रथम मानांकनाने गौरवण्यात आले. संबंधित पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी स्वीकारला. व्यासपीठावर आरोग्य विभागाचे राज्य पातळीवरील अधिकारी डॉ.आंबाडेकर डॉ. स्वप्नील लाळे, डॉ. गंधेवार, डॉ. सुमिता गोलाईत आदींची उपस्थिती होती.
गोंदिया जिल्हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या सीमा लगतचा शेवटचा जिल्हा आहे. आदिवासी, नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त सीमा अशी जिल्ह्याची ओळख आहे.विविध आजार बळावलेले असतात. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवुन हे यश संपादन केले असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे ,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकजजी रहांगडाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती यशवंतजी गणविर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यास्तरिय अधिकारी त्यात जिल्हा साथरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी ,सहाय्यक संचालक कुष्ठरोग व ईतर तसेच तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य विस्तार अधिकारी यांचे पर्यवेक्षण आणि गाव पातळीवरचे सैनिक आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका यांनी लोकांना गुणात्मक सेवा दिल्याने व त्या कामांचे अहवाल करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर, तालुका स्तरीय कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कार्यक्रम समन्वयक, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केल्याने जिल्ह्याची रँकिंग प्रथम क्रमांकावर आली आहे.
जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय समिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असते. त्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकजजी रहांगडाले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती यशवंतजी गणविर यांनी सुचविलेल्या प्रमाणे नियोजन कामी येत आहे. तालुकास्तरीय विविध सभा घेण्यात येऊन आरोग्य कार्यक्रमावर ठोस नियोजन करण्यात येत असते. जिल्हास्तरिय अधिकारी यांनी तालुकास्तरीय आढावा सभेसोबतच प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावुन सभा घेण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या विविध राष्ट्रीय आरोग्य निर्देशांकावर सुधारणा करण्यावर भर देण्यात येतो. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबाबत महिनानिहाय मासिक सभा, ऑनलाईन बैठका घेऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिलेल्या सूचना कामी येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी म्हटले आहे.
भविष्यकाळात प्रभावीपणे सेवा देण्यावर भर
आरोग्य विभागाने नियोजन पूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याचे फळ मिळत आहे. आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी व गाव पातळीवरचे कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. भविष्यकाळात लोक सहभागातून अजून प्रभावीपणे सेवा देण्यावर आमचा भर राहील. आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती अंतर्गत सर्व माहिती पोर्टलवर विहित कालमर्यादेत भरण्यावर जोर देण्यात येणार आहे.
– अनिल पाटिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया






