स्वीप सेलचे अभिनव उपक्रम : विविध माध्यमांचा कल्पकतेने वापर करून मतदार जागृती
गोंदिया : मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर करावा, यासाठी स्वीप सेलच्या माध्यमातून मतदान जागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील भिंतीवर रंगविण्यात आलेले विविध संदेश मतदारांना चांगलेच आकृष्ट करीत असून भिंतीही आता मतदान करण्याविषयी बोलू लागल्या आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार जागृती अभियान (स्वीप सेल) यांनी विविध माध्यमांचा कल्पकतेने वापर करून शहरातील विशेषतः जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीच्या भिंतीवर अतिशय सुंदर व नेमका अर्थ सांगणारे संदेश अंकित केले आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन या संदेशात आहे. या सोबतच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, पथनाट्य, जिंगल्स, रिल्स, चावडी भेट, वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जाते आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम अभियान राबविले आहेत. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते कर्तव्य प्रत्येक व्यक्तीने बजावले पाहीजे. मात्र, मतदान करण्याविषयी अनेक व्यक्तींमध्ये अनास्था दिसून येते. जिल्ह्यातील सर्व वयोगटातील व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप सेल’च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. स्वीप सेलच्या माध्यमातून दिव्यांग, वयोवृध्द, नवमतदार, तृतीय पंथी व्यक्तींपर्यंत पोहचून सर्वांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. शिवाय विविध माध्यमांचा वापर करीत आता थेट जिल्ह्यातील सर्वच मतदारांपर्यंत पोचण्यात येत आहे. विविध शासकीय उपक्रमात मतदान करण्याविषयी प्रतिज्ञा घेण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील विविध शासकीय इमारत परिसरात मतदान जागृतीबाबतचे पोस्टर चिटकविण्यात आले आहेत. मुलांनी आपल्या पालकांना मतदान करण्याविषयी सांगावे यासाठी ‘बालकांचे पालकांना पत्र’ हा अभिनव उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविण्यात आला. शिवाय मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा सुध्दा घेण्यात आलेल्या आहेत. यात शालेय विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदविला. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात भिंतीचित्र काढण्यात आले. हे भिंतीचित्र प्रत्येक व्यक्तीला आकृष्ट करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, जिल्ह्यातील मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांच्या संकल्पनेतून ‘हयूमन चेन’ तयार करण्यात आली. याला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचे काव्य वाचन, गीत गायन, मतदान जागृतीपर भाषण, नागरिकांचे तथा नवमतदारांचे मनोगत सामाजिक माध्यमांवर अधिकच जागृती करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, विविध शाळांमध्ये नाटीका सुध्दा तयार करण्यात आल्या असून त्यांचे सामाजिक माध्यमातून सादरीकरण केले जात आहे.
विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून त्यांच्या पालकांना मतदान करण्यासाठी जागृत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्या सर्व उपक्रमात ‘चुनाव की पाठशाला’ हा उपक्रम देखील मनोरंजनासह मतदारांमध्ये जागृती निर्माण करणारा ठरत आहे. जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि मागास भागात अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी जिंगल्स तयार करण्यावर देखील स्वीप सेलचा भर असून चावडीवरील बैठका, स्लम क्षेत्रात नागरीकांना मार्गदर्शन, युवकांच्या बैठका, शासकीय कार्यक्रमांतील आवाहनावर देखील भर देण्यात येतो. स्वीप सेलचे विविध कार्यक्रम स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येत असून सहायक नोडल अधिकारी शिखा पिपलेवार चांगलेच परिश्रम घेत आहेत. मतदारांच्या जनजागृतीसाठी हे कार्यक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी आपल्या मताधिकारांचा वापर करावा. जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात शंभर टक्के मतदान होईल, यासाठी सर्वांनीच प्रयत्नशिल राहावे, मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन स्वीप सेलचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी केले आहे.