गोंदिया : जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढलेले आहे. मात्र ज्या नागरिकांनी आधार कार्ड काढून मागील दहा वर्षात आधार कार्डचा वापर कोठेही केला नसेल, केवायसी केले नसेल अशा व्यक्तींनी आपले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा हे कार्ड बंद होण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांकाची मागणी केली जाते. आधार क्रमांक नसेल तर ते काम पूर्ण होत नाही. आधार कार्ड महत्वाचा पुरावा असल्यामुळे सर्वांनी आपले आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.
20 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आधार कार्ड अद्ययावत करण्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, न.प.मुख्याधिकारी करण चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, दिपक शिर्के राज्य व्यवस्थापक आधार क्षेत्रिय कार्यालय मुंबई, अनिल मराठे केंद्र व्यवस्थापक नागपूर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनीकर, जिल्हा समन्वयक राकेश हिवरे, विशाल बागडदे SSE जिल्हाधिकारी कार्यालय, दिपक बिसेन CSC E-Gov. व्यवस्थापक गोंदिया यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या आधार पोर्टलवरुन https://myaadhaar.uidai.gov.in किंवा https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या प्रणालीमध्ये ऑनलाईन आधार अद्ययावत केल्यास दिनांक 14 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना कोणतेही शुल्क लागणार नाही. शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ संबंधित नागरिकांना वेळीच प्राप्त व्हावे यादृष्टीने सर्वांचे आधार नोंदणी योग्यरित्या अद्ययावत असणे नितांत गरजेचे आहे असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यात तालुका, ग्रामपंचायत कार्यालय स्तरावर एकूण 251 आधार केंद्रे (UIDAI) स्थापित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये बँक-16, पोष्ट ऑफिस-93 अधिक 09, प्रत्येक तालुक्यात 02 प्रमाणे शिक्षण संस्थेकरीता-16, WCD विभाग-30, Maha-IT विभाग-53, CSC विभाग-32 अधिक 02 असून त्यानुसार सर्व नागरिकांनी त्यांचे आधार नोंदणी व लहान मुलांचे आवश्यक बायोमेट्रिक अपडेट शक्य तितक्या लवकर पूर्ण करुन घेणे अनिवार्य आहे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे, पोष्ट ऑफिस व बँक यांनी त्यांच्या Client चे, शिक्षणाधिकारी यांनी त्यांचे विद्यार्थी व पालकांचे, पुरवठा विभागाने त्यांच्या धान्य केंद्रावर येणाऱ्या लोकांचे आधार कार्ड अद्ययावतीकरण प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी. जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या ग्रामपंचायत मार्फत आधार अपडेट करण्याबाबत जागोजागी दवंड्या देऊन जनजागृती मोहिम राबविण्यात यावी. विविध शाळा, महाविद्यालये, बँक इत्यादी यंत्रणेस सदर विषयाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे अर्धशासकीय पत्र देण्यात आलेले असून प्रत्येक विभागाने त्यांचे कार्यालयातील किती अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आधार अपडेट झालेले आहेत त्याबाबतची माहिती प्रपत्र क्र.01 मध्ये rdcgon@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावे. आधार लिंक जन्म नोंदणीची अंमलबजावणी Maha-IT Agency ची एक आधार संच (श्री. राजेश तावाडे) बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे स्थापित करण्यात आलेली आहे. तसेच आधार लिंक जन्म नोंदणी आंगणवाडी सेविका मार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या राशन दुकानामध्ये सर्वसामान्य नागरिकाशी संपर्क साधून अशा ठिकाणी सुध्दा आधार कार्ड अपडेट करण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशी माहिती सभेत देण्यात आली.
आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
RELATED ARTICLES