Tuesday, May 21, 2024
Google search engine
HomeUncategorizedआमदार कोरोटे यांच्या तपासणीत दोन हजार क्विंटल तांदूळ 'फेल'

आमदार कोरोटे यांच्या तपासणीत दोन हजार क्विंटल तांदूळ ‘फेल’

देवरी येथील आशू गोदामातील प्रकार
गोंदिया : आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी शनीवार (ता.१५ जुलै ) रोजी देवरी येथील आशू तांदूळ गोदामाची पाहणी केली असता त्यात त्यांना एकसमान व जुनाच तांदूळ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तांदळाचा नमुना स्वतः घेऊन संबंधितांकडून रासायनिक परीक्षण करून घेतले. सदर तांदूळ खाण्यास अयोग्य ‘असल्याचे स्पष्ट झाल्याने तांदळाचे ४ लॉट (२१६० क्विंटल) रद्द करण्यात आले. तसेच बुलढाणा जिल्ह्यात जाणाऱ्या ट्रकमधील तांदळाचेही परीक्षण केले. हा तांदूळ ही खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट होताच ट्रकमधील संपूर्ण तांदूळ परत करण्यात आला. या प्रकारामुळे गुणवत्ता तपासणी अधिकाऱ्यांच्या कामावर चे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
देवरीतील एका गोदामात तांदळाचा काळाबाजार होत असल्याची माहिती आमदार सहषराम कोरोटे यांना मिळताच त्यांनी शनिवारी आशू तांदूळ गोदामात धडक देऊन पाहणी केली. यावेळी त्यांना गोदामातील संपूर्ण तांदूळ सारखाच व जुना दिसला. विशेष म्हणजे, हा तांदूळ विविध राईस मिलर्सनी शासनाकडे जमा केला होता. तांदळाची गुणवत्ता तपासली असता गोदामातील ४ लॉट (प्रतिलॉट ५४० क्विंटल) तांदूळ तपासणीत अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले. देवरीतच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील गोदामांतील शासकीय तांदळाची वरिष्ठ अधिकारी व खासदार, आमदारांनी पुढाकार घेऊन तपासणी केल्यास
मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल, यात शंका नाही. दरम्यान, पुरवठा अधिकाऱ्यांना राईस मिलर्सवर कारवाई करण्याच्या सूचना आ. कोरोटे यांनी यावेळी दिल्या आहेत.

अयोग्य तांदूळ पूरवठा अधिका-यांनी घेतलाच कसा ?
देवरीतील सात राईस मिलर्सनी आशू गोदामात जमा केलेला २१ लॉट ( ११३४० क्विंटल) तांदूळ खाण्यास योग्य नसल्याचे मे महिन्यात केंद्रीय पथकाने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सातही मिलर्सनां तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून तेवढाच तांदूळ जमा करण्याबाबत बजावले होते. तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी आणि सध्या अतिरिक्त जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत सतीश अगडे यांनी हा तांदूळ केमिकल टेस्टिंगमध्ये अयोग्य असतांना घेतलाच कसा, असा प्रश्न आमदार कोरोटे यांनी उपस्थित केला आहे. यात विशेष म्हणजे प्रशासनाने श्री अगडे यांना पदोन्नतीसुद्धा दिली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील धानाची छत्तीसगडमध्ये विक्री
गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यात ५० लाख क्विंटलच्यावर धान शेतकऱ्यांकडून शासकीय दराने खरेदी केला. गोंदिया-भंडारा जिल्ह्यांसह गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील राईस मिल मालकांकडून धान्याची भरडाई करून तांदूळ शासकीय गोदामात जमा करण्याचा करार केला आहे. मात्र, राईस मिल मालकांना दिलेल्या धानाची काही राईस मिल मालकांनी भरडाई न करता जिल्ह्यातील धानाला छत्तीसगड राज्यात जास्त दर मिळत असल्याने विकले.आणि उत्तर प्रदेश राज्यातील हलक्या दर्जाचा तांदूळ विकत घेत जिल्ह्यातील शासकीय तांदूळ गोदामात अधिका-यांच्या संगनमताने जमा करीत असल्याचा आरोप लावण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments