गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन
गोंदिया : देशाच्या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचे स्वप्न साकारताना सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेने सामर्थ्यशाली होऊ शकेल. यासाठी सर्वांनी आपली जीवनचर्या योग्य पद्धतीने राखून प्रकृतीची काळजी घ्यावी तसेच देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या वास्तूच्या भूमिपूजन समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, सुनील मेंढे, डॉ. सी.एम. रमेश, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरेटे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर व अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण तसेच सार्वजनिक आरोग्य विषयक सुविधांबाबत समाधान व्यक्त करून उपराष्ट्रपती म्हणाले, आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नागरिकांना उपचारासाठी केवळ आर्थिक मदत नव्हे तर या माध्यमातून आरोग्यविषयक संपूर्ण सेवा अत्यंत प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेद हा देशाचा मोठा सांस्कृतिक वारसा असून त्यात मोलाचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आहे. उत्तम आरोग्याची जपणूक करून आपण नव्या भारताच्या निर्मितीत योगदान देऊ शकतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.
योगविद्येच्या माध्यमातून भारताने जगाला एक मोठी देणगी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग पोहोचला आहे असे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले, यापूर्वी साधारण आजारांवरील उपचारांसाठीही परदेशात जावे लागत होते आता देशात सर्वत्र प्रगत उपचार उपलब्ध झाले आहेत. महाराष्ट्राने जिल्हास्तरावर सुपरस्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठी मदत होईल. औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचा विशेष उल्लेख करून प्राचीन काळापासून सुरू असलेली आयुर्वेद जीवनपद्धती जपण्याचे आवाहन, उपराष्ट्रपतींनी केले.
आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त : मुख्यमंत्री
गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही जिल्ह्यातील नागरिकांची आग्रही मागणी होती. नव्या वास्तूचे भूमिपूजन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.