मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन : 15 पासून स्वच्छता ही सेवा उपक्रमाला सुरवात
गोंदिया : गावांगावातील दृष्यमान स्वच्छतेवर शासनाचा भर आहे. आपले गाव स्वच्छ व सुदर करण्यासाठी 15 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘कचरामुक्त भारत’ ही यावर्षी स्वच्छता ही सेवा उपक्रमाची थिम असून आपले गाव श्रमदानातून स्वच्छ करा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिल पाटील यांनी केले आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी संपूर्ण देशभरात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येतो. स्वच्छतेच्या या जनआंदोलनात श्रमदानावर भर देण्यात आलेला आहे. आपले गाव स्वच्छ आणि सुंदर असावे, यासाठी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करावे. श्रमदानातून गावस्तरावरील बसस्थानक, रेल्वे स्थानके, नदी किनारे, पर्यटन स्थळे, प्राणीसंग्राहलय, राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, घाट व नाले असे सार्वजनिक ठिकाणात स्वच्छता मोहीम राबवावी. गावस्तरावर उपक्रम राबविण्यासाठीआठही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निर्देश देण्यात आले असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरेश भांडारकर यांनी कळविले आहे. स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत गावांमधील सर्व पारंपारीक ठिकाणांची स्वच्छता, सार्वजनिक शौचालय, कचराकुंडया, कचरा वाहतूक करणाऱ्यां वाहनांची साफसफाई, स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून दुरूस्ती, रंगकाम करणे, स्वच्छता प्रतिज्ञा घेवून गाववस्तरावर श्रमदानातून स्वच्छत मोहीम राबविणे. विशेष म्हणजे, नदीकाठ व नाला परिसरातील प्लॅस्टीक कचरा साफ करण्याची मोहीम राबविण्यावर शासनाने भर दिला आहे. दरम्यान स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायतीसह नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी, स्वच्छता प्रहरी, बचतगट, स्वच्छताग्रही, व्यापारी संघटना, गावकरी व नागरीकांनी आपापल्या क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबवावी, स्वच्छतेच्या या लोकचळवळीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल पाटील, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरेश भांडारकर यांनी केले आहे.
‘हिरवा ओला, सुका निळा’
घनकचऱ्याचे व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. सोबतच एकल वापराऱ्या प्लॅस्टीक वस्तूंचा वापर रोखण्यासाठी जनजागृतीवर शासनाचा सर्वाधिक भर आहे. नागरीकांनी एकल वापराच्या प्लॅस्टीकचा वापर टाळावा. तथा घरातील ओला आणि सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे. ओला कचरा हा हिरव्या कचराकुंडीत तर सुका कचरा हा निळया कचराकुंडीमध्ये टाकावा, त्यासाठी स्वच्छता ही सेवा उपक्रमांमध्ये ‘हिरवा ओला, सुका निळा’ या उपशिर्षाखाली उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भारतीय स्वच्छता लीग
युवक हे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यामध्ये स्वच्छतेच्या सवयी बाणविणे अत्यंत गरजेचे आहे. युवकांच्या नेतृत्वाखाली गटांना एकत्रित करून सार्वजनिक ठिकाणात विशेषत: पर्यटनाच्या ठिकाणात स्वच्छता मोहीमेवर भर देण्यात आला आहे. यासोबतच सफाई मित्र सुरक्षा शिबीरही राबविण्यात येणार असून त्यामाध्यमातून केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा समावेश करून शिबीराचे आयोजन मोहीमेदरम्यान करण्यात येणार आहे.