Friday, June 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedकृषी महोत्सवात पीक विविधिकरणावर भर द्या : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

कृषी महोत्सवात पीक विविधिकरणावर भर द्या : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

१३ ते १७ पर्यंत कृषी महोत्सव
शासनाचे २७ विभाग सहभागी होणार
माहितीचे दोनशेहून अधिक स्टॉल
गोंदिया : गोंदिया हा कृषी आधारित उद्योग असलेला जिल्हा असून पारंपारीक धान पिकांसोबतच पीक विविधिकरणाची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. तेलबिया, डाळी तसेच भाजीपाला आदि नगदी पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी महोत्सवात प्रोत्साहित करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी कृषी विभागाला केल्या. १३ ते १७ जानेवारी 2024 दरम्यान मोदी मैदान, गोंदिया येथे जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्या संबंधीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. कृषी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, प्रकल्प संचालक आत्मा अजित अडसुळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शकिर अली शेख व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या तयारीचा आढावा आज जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या महोत्सवात शासनाच्या २७ विभागाचा सहभाग असणार आहे. माहिती व कृषी साहित्याचे दोनशेहून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लागणार आहेत. शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची आग्रही भूमिका आहे. यासाठी ‘शासन आपल्या दारी’ यासारखे अभियान राबविण्यात येत आहे. हे लक्षात घेता सर्व विभागांनी कृषी महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. कृषी आधारित उद्योग असलेला आपला जिल्हा असून पीक विविधिकरणाची माहिती शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. केवळ धान शेती न करता शेतकऱ्यांनी अन्य पिकांकडे सुद्धा वळावे यासाठी शेतकऱ्यांना कृषी महोत्सवात प्रोत्साहित करावे असे त्यांनी सांगितले. यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. पीक विविधिकरण विषयातील तज्ञ व्यक्तींचे सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन होईल यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो असा अनुभव आहे. त्यामुळे कृषी महोत्सवातून शेतकरी नवीन गोष्टी शिकेल व त्याचे प्रयोग आपल्या शेतात करेल यासाठी कृषी विज्ञान केंद्राने नियोजन करून कृषी विभागाने सर्व सहकार्य करावे असे ते म्हणाले. या महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे कृषी अवजारे यांचेही प्रदर्शन असणार आहे. कृषी महोत्सव हा शेतकरी व शेती अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार असून सर्व विभागांनी आपापल्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना द्यावी. या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांना पोहचवण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी केले. या महोत्सवात शेती विषयांवर परिसंवाद व चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. याठिकाणी पीक, पीक पद्धती, पारंपारिक व आधुनिक शेती, कृषी अवजारे, शेतीपुरक व्यवसाय, जोडधंदे आदी विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments