दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियान
गोंदिया : दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याकरीता शासनाद्वारे दिव्यांगांसाठी नवनविन उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुखकर करावे. कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, असे प्रतिपादन आमदार तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मरारटोली, गोंदिया येथे 17 ऑगस्ट रोजी आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे हे होते.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, जि.प.समाज कल्याण समिती सभापती पुजा सेठ, रेल्वे विभागाचे नागपूर मंडळाचे सहायक वाणिज्य प्रबंधक अविनाशकुमार आनंद, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आमदार बच्चू कडू पुढे म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करण्यात आलेले आहे. दिव्यांग बांधवांचे हित लक्षात घेवून त्यांच्या अडिअडचणींवर मात करण्यासाठी समाज कल्याण विभागात येत्या दोन महिन्यात 2 हजार कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचा निधी दिव्यांग बांधवांच्या सोई-सुविधेकरीता उपलब्ध करुन देण्यासाठी राखून ठेवण्यात यावा. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांना UDID कार्डचा लाभ देण्यात यावा. मी माणूस आहे असे भान ठेवून काम करावे. जिल्हा प्रशासनाने मनापासून काम करण्याची गरज आहे. दिव्यांग बांधवांसाठी अधिक चांगल्या प्रकारचे काम करता येईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष्य देणे गरजेचे आहे. सदर अभियान नियमीतपणे सुरु राहणार आहे, त्यामुळे दिव्यांग बांधवांनी लाभ घेण्यासाठी चिंता करण्याची आवश्यता नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे म्हणाले की, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना सोयी-सवलती देण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी शासनाच्या अधिकाधिक योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुखकर करावे. अनिल पाटील म्हणाले की, दिव्यांग बांधवांच्या अडिअडचणीला सामोरे जावून कामे करण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
गोंदिया येथील जिल्हा समाज कल्याण कार्यालयातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावे, कार्यालयात मनुष्यबळ असेल तर समाजाच्या हिताचे काम करणे सोईचे होईल असे पूजा सेठ यांनी सांगितले. यावेळी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते. त्यामध्ये UDID कार्ड तयार करणे, दिव्यांग स्वयंरोजगार केंद्र, जिल्हा दिव्यांग पुनर्वास केंद्र, समग्र शिक्षा-समाविक्षीत शिक्षा, ओम दिव्यांग स्वयंसहाय्यता समुह, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, समदृष्टी क्षमताधिकार व संशोधन मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद), रेल्वे विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, किरण मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्र आदिंचा यात समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय गणवीर यांनी केले. सुत्रसंचालन डिंपल चौधरी यांनी केले. कार्यक्रमास दिव्यांग बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणताही दिव्यांग बांधव लाभापासून वंचित राहू नये : बच्चू कडू
RELATED ARTICLES