भंडारा : घरातून बेपत्ता झालेल्या एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जवळच्या गणेशपूर येथील स्मशानभूमीजवळील सुरक्षा भिंतीजवळ रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. परंतु, तीन दिवसानंतरही आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पीडित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
माहितीनुसार, ४७ वर्षीय पीडित महिला ही मनोरुग्ण आहे. घटना उघडकीस आल्याच्या दोन दिवसांपूर्वीपासून ती बेपत्ता झाली होती. तशी तक्रार तिच्या कुटुंबीयांनी भंडारा पोलिसात केली होती. रविवारी (ता. ३0 एप्रिल) गणेशपूर येथील स्मशानभूमीजवळील सुरक्षा भिंतीजवळ ती बेशुद्धावस्थेत विवस्त्र आढळून आली. त्यानंतर तिला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची तपासणी केल्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी गुन्हा बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी माहितीच्या आधारावर चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविल्यानंतरही पोलिसांना अद्याप काहीही हाती लागलेले नाही. सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेजही तपासण्यात आले आहे. पोलिसांचे विविध पथक तयार करुन कसून तपास सुरू आहे. परंतु, आरोपी अजूनही मोकाट आहेत. या घटनेमुळे गणेशपूरसह परिसरात संतापाचे वातावरण आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सोयाम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रविवारी सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ती विवस्त्र होती. सदर महिला मनोरुग्ण असून, तिची शारीरिक स्थिती नाजूक आहे. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात एकच आरोपी असण्याची शक्यता असून पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली.
गणेशपूर येथे मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग
RELATED ARTICLES