गोंदिया :जिल्ह्यात माता व बालमृत्यूचे प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. परिणामी शासन-प्रशासन उपाययोजना करीत असूनही यावर आळा घालण्यासाठी नवनवे उपक्रम राबविले जात आहेत. यानुसार आता जिल्ह्यात शुन्य मृत्यू अभियान राबविण्याचा संकल्प घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून माता व बालमृत्यूवर आळा घालण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच संकल्प अभियान कार्यशाळा पार पडली. यात जिल्हाधिकारी गोतमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आरोग्य विभागाने जिल्ह्यातील गर्भवती माता व बाल मृत्यू टाळण्यासाठी शून्य मृत्यू अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे. त्याबाबत संकल्प अभियान कार्यशाळा ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. सभेला जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल उपस्थित होते.
शासन-प्रशासनाकडून बाल व माता मृत्यू टाळण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहेत. पण आजही प्रभावी जनजागृती अभावी बाल व माता मृत्यू टाळता आले नाही. परिणामी अधिकाधिक उपक्रम राबविण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने केला आहे. यासाठी शुन्य मृत्यू अभियान अभियान राबविण्यात येणार आहे. शून्य माता मृत्यू अभियानात आरोग्य विभागासह महिला व बालविकास, समाज कल्याण, आदिवासी विभाग, खाजगी व निम सरकारी संघटना यांचा सहभाग घेतला जाणार आहे. वेळोवेळी गरोदर मातेचे पती अथवा नातेवाईक यांचे सुद्धा समुपदेशन करण्यात येणार आहे. गर्भवती मातांनी गरोदरपणात आहार व आवश्यक तपासण्याकडे लक्ष दिल्यास प्रसुती दरम्यान गुंतागुत टाळता येतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दर बुधवारी सर्व्हायकल कँसरची व दर गुरुवारी थॉयराईडची तपासणी सुद्धा दुपारी १२ ते २ दरम्यान मोफत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून १२ आठवड्याच्या आत गरोदर मातेची नोंदणी करणे व गरोदर मातेच्या चार तपासण्या, लसीकरण, प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी, समुपदेशन करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय कार्यशाळेला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी.जयस्वाल, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.रोषन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रु.ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र व भरारी पथकाचे वैद्यकिय अधिकारी, जिल्हा स्तरीय आरोग्य पर्यवेक्षक, राष्ट्रिय आरोग्य अभियानाचे कार्यक्रम समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे तालुका आरोग्य सहाय्यक उपस्थित होते.
जिल्ह्यात माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘शून्य मृत्यू अभियान’
RELATED ARTICLES