स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
गोंदिया : सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्य करीत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग आता नागपूरपासून गोंदिया पर्यंत वाढविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत. महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्यातर्फे प्रती शेतकरी 6 हजार रुपये. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा. राज्यातील सर्व नागरिकांना १५ ऑगस्टपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत.
अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा तसेच प्रलंबीत प्रकल्प पूर्ण करण्याचे लोककल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. राज्यात व आपल्या जिल्ह्यात प्रगती आणि विकासाच्या नव्या आशा व आकांक्षाची पायाभरणी या निमित्ताने झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.
पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सन 2022-23 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकविला आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात आले असून सदर दवाखान्यात नागरिकांना मोफत संदर्भसेवा पुरविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास कार्यक्रम या तिन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो. सन 2022-23 मध्ये जिल्ह्यात 100 टक्के अनुदानावर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांच्या 241 सिंचन विहिरी पुर्ण करण्यात आल्या असून शेतकरी आपले उत्पादन वाढविण्याकरीता या योजनेचा लाभ घेत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये 127 कि.मी. लांबीचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले असून त्यावर 61 कोटी 48 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2022-23 मध्ये 87.65 कि.मी.ची 45 कामे पूर्ण करण्यात आलेली असून त्यावर 73 कोटी 88 लाख रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे.