गोंदिया: जिल्हा परिषद गोंदिया मार्फत जिल्हयात एकुण १०१७ प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा चालविण्यांत येत आहेत. सदर शाळेत प्राथमिक शिक्षकांच्या एकुण ३५५ शिक्षक कमी असल्याने कार्यरत शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त बोझा पडत आहे तसेच विद्यार्थ्याचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मानधन तत्वावर स्वयमसेवक शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समेत ठराव घेवून सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यांत आल्याने २१० शिक्षक शाळेला उपलब्ध होईल अशी माहिती पंकज रहांगडाले जि.प.अध्यक्ष यांनी दिली.
चालु शैक्षणिक सत्रात एकुण २१० मानधन तत्वावर स्वयंमसेवक शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतिने होणार आहे. उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती इंजी. श्री. यशवंत गणवीर यांनी सदर कार्याकरीता मोलाचे सहकार्य दिले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरीता स्वयंमसेवक शिक्षकाच्या माध्यमाने शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिलेल्या नियोजनाकरीता जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक वर्गात उत्साहाचे वातावरण दिसून आले.