गोंदिया : मागील महिनाभरापासून विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात होत असून सर्वात जास्त थंडी येथेच पडत आहे. असे असतानाच गुरूवारी (दि.४) ढग दाटून आले असून दिवसभर पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी (दि.५) पावसाची शक्यता वर्तविली आहे. अगोदरच थंडीचा जोर असल्यामुळे सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. त्यात आता पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्यांची आरोग्याला घेऊन चिंता वाढली आहे.
यंदा ऋतू चक्र कसे काय आहे याचा अंदाज घेणे कठीण झाले आहे व याची अनुभूती उन्हाळा व पावसाळ्यात चांगलीच आली आहे. उन्हाळ्यात जेवढे ऊन तापले नाही तेवढे जून महिन्यात तापले व जून महिन्यात पाऊस बरसला नसून हिवाळ्यात अवकाळी पाऊस जिल्ह्याला झोडपून नासाडी करताना दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवट व डिसेंबर महिन्याची सुरूवात अवकाळी पावसात गेली. त्यानंतर १० डिसेंबरपासून जिल्ह्याचे तापमान घसरत चालले असून जिल्हा विदर्भात सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. अचानकच थंडीचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यात सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात निघत आहेत. असे असतानाच गुरूवारी (दि.४) जिल्ह्याचे कमाल तापमान २७.८ अंश तर किमान तापमान १३.५ अंशावर आले होते. किमान तापमानात जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता. जिल्ह्यात थंडीचा जोर कायम असतानाच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र गुरूवारी सकाळापासून ढग दाटून आले व पावसाचे वातावरण दिसून येत होते. यातही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींना घेऊन जिल्हावासी त्रासले असतानाच आता पाऊस वातावरणात बदल होऊन आणखी त्रास वाढणार असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
ढग आले दाटून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची वाढली चिंता
RELATED ARTICLES