गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील प्रकार : तालुका शिक्षण विभागाची नाचक्की
गोंदिया : स्वदेशी खेडोत्तजक मंडळाचा गाशा गुंडाळत गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, सोमवार (ता. 18) तालुका स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार गोरेगाव येथील तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव तेथील पंचायत समिती कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घोटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घेण्यात येत आहे. मात्र, यातही तालुका शिक्षण विभाग व आयोजकांची नाचक्की दिसून आली असून कार्यक्रमाच्या उद्घाटनापासूनच थेट विद्युत तारांवर आकडा टाकून विज चोरी करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले आहे.
एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी यासाठीही विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, काही कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे शासनाच्या या उपक्रमाचे तीनतेरा वाजत असल्याचेही अनेकदा पुढे आले आहे. विशेष म्हणजे शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने स्वदेशी खेळतोत्तजक मंडळाअंतर्गत दरवर्षी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत होते. यात केंद्रस्तरीय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत होते. यात लोकसहभागही असल्यामुळे ज्या गावात या स्पर्धा व्हायच्या त्या गावाला जत्रेचे स्वरूप येत होते. मात्र, कोविड काळात या स्पर्धा होऊ शकल्या नाही तर त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने स्वदेशी खेडोत्तजक मंडळाचा गाशा गुंडाळून अटल क्रीडा महोत्सवाला सुरुवात केली. या अंतर्गत बीट, तालुका व जिल्हा स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेत. यानुसार सोमवार तारीख 18 डिसेंबर पासून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, गोरेगाव तालुक्यातील तालुका क्रीडा महोत्सव जवळच्या घोटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे. मात्र, या आयोजनादरम्यान शिक्षण विभाग व आयोजकांनी शाळेवर वीज बिलाचा भार येऊ नये यासाठी थेट वीज चोरी केल्याचेच दिसून आले. विशेष म्हणजे, शाळेच्या आवार भिंतीला लागूनच महावितरणचे विद्युत खांब असून मुख्य प्रवेश दाराच्या बाजूलाच विद्युत तारांवर आकडा टाकण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे या तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाला चोरीच्या विजेच्या आसरा घेण्याची वेळ शिक्षण विभागावर आली असल्याची चर्चा गावात होऊ लागली आहे.
शाळेतही राजकारण
शाळेला विद्येचे पवित्र मंदिर मानले जाते. मात्र, आजघडीला शाळेतही राजकारण होऊ लागल्याचे चित्र घोटी येथील तालुकास्तरीय क्रीडा संमेलनातून दिसून आले. आयोजकांकडून केवळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मान देण्यात येत असल्याचे चित्रही या संमेलनादरम्यान दिसले तर गावात तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यासाठी गावातील नागरिकांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
जप्तीची कारवाई
शाळेत विज चोरी करणे चुकीचे आहे. याविषयी माहिती होताच आपण स्वतः जाऊन वायर व इतर साहित्य जप्त केले.
विवेक गजभिये, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गोरेगाव