आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेर यांची देवरी ग्रामीण रुग्णालयाला भेट
गोंदिया. देवरी येथे बांधण्यात आलेली ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत येत्या १५ दिवसात रुग्णांच्या सेवेसाठी खुली करणार असल्याची ग्वाही, नागपूर क्षेत्राच्या आरोग्य उपसंचालिका डॉ. कांचन वानेर यांनी देवरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना काल सोमवारी (दि.२१) दिली.
डॉ. वानेर या देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीसाठी काल देवरी येथे आल्या होत्या. त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी नवीन इमारतीचे सुद्धा अवलोकन केले. देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल दुर्गम भागातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने देवरी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. सध्या कार्यरत जुनी इमारत ही पूर्णतः जीर्ण झाली असून ठिकठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. याशिवाय या इमारतीमध्ये पावसाळ्याच्या दिवसात रुग्ण असलेल्या वॉर्डांमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
या रुग्णालयासंबंधी समस्यांची तक्रार विद्यमान आमदार सहसराम कोरोटे यांना करण्यात आल्याने त्यांनी गेल्या जुलै महिन्यात सदर इमारतीची पाहणी केली होती. त्यामुळे आमदार कोरोटे यांनी नवीन इमारतीचे लोकार्पण पंधरा दिवसाच्या आत करून रुंग्णांची हेळसांड थांबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. मात्र, आरोग्य विभागाने आमदारांनी केलेल्या सूचनांना गांभीर्याने घेतले नसल्याचे निदर्शनात आल्याने गेल्या १५ ऑगस्ट रोजी आमदार कोरोटे यांनी या इमारतीचे लोकार्पण उरकून घेतले. याशिवाय श्री कोरोटे यांनी या नवीन इमारतीमधून येत्या ८ दिवसात रुग्णसेवा सुरू करण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांना दिल्या होत्या. यामुळे उपसंचालक डॉ.वानेर यांनी काल या रुग्णालयाला भेट दिली. नवीन इमारतीसाठी संबंधित विभागांकडून लागणारे नाहरकत प्रमाणपत्र येत्या पंधरा दिवसात मिळविण्याची कार्यवाही पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. इमारत पूर्ण झाली असून आरोग्यसेवा देण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.अग्निशमन, पाणी, आणि वीजेची उपलब्धता लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. किमान पंधरा दिवसात बाह्यरुग्ण सेवा तरी सुरू करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिल्याचे सांगितले. परिणामी,नवीन इमारतीचे बांधकाम संथगतीने करून रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकाराला आमदार सहसराम कोरोटे यांनी उचलेल्या पावलांमुळे चांगलीच चपराक बसल्याच्या चर्चा यामुळे रंगल्या आहेत. परिणामी, उशिरा का होईना आरोग्य विभाग खडबळून जागे झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
देवरी ग्रा. रु.ची नवीन इमारत १५ दिवसात रुग्णसेवेसाठी खुली करणार : आरोग्य उपसंचालिका
RELATED ARTICLES