अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार बोनस
गोंदिया : कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत. त्यातही उत्पादन झालेल्या धानपिकांपासून लागवड खर्चही निघत नाही. त्यामुळे धानाला बोनस जाहिर करण्यात यावे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांची भेट घेतली होती. यानुरूप आज (ता.१८) अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धानाला हेक्टरी २० हजार रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहिर केले आहे. यामुळे शेतकर्यांनी राज्य सरकारसह खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.
खा.प्रफुल पटेल हे सदैव शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतात. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत येतो. तेव्हा तेव्हा शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खा.पटेल यांचे प्रयत्न सार्थक ठरत असते. त्यातच यावर्षी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यासह विदर्भातील धान उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. एवढेच नव्हेतर उत्पादनातही घट आली. यामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकर्यांना योग्य ती मदत व्हावी, या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला भेट दिली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने धानाला बोनस जाहिर करण्यात यावे तसेच पीक नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, यासंदर्भात निवेदन देत चर्चा केली. यानुरूप आज अधिवेशनदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी धानाला हेक्टर २० हजार रूपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस जाहिर केले. यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने धान उत्पादक शेतकर्यांना बोनस जाहिर झाल्याने शेतकर्यांकडून त्यांचे आभार मानले जात आहे. उल्लेखनिय असे की, राज्य सरकारला निवेदन देतानी माजी आमदार राजेंद्र जैन, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ.राजु कारेमोरे तसेच गोंदिया-भंडारा व नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.