जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते 30 लाभार्थी लाभान्वित्त
गोंदिया : वनहक्क कायद्यांतर्गत मान्य करण्यात आलेल्या वनहक्क धारकांना दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे व उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते 30 लाभार्थ्यांना वन जमिनीचे वनपट्टे वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रम दृक श्राव्य प्रणाली द्वारे देशाचे पंतप्रधान यांचे संवादात्मक भाषणाच्या माध्यमातून करण्यात आले.
सदर कार्यक्रमात प्रामुख्याने चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी (सामान्य), परवणी पाटिल उपविभागीय अधिकारी गोंदिया, पूजा गायकवाड उपविभागीय अधिकारी तिरोडा, जि प सदस्य माधुरीताई रहांगडाले, निशाताई तोडासे, हनुमंत वट्टी, तहसीलदार किशोर भदाणे, अनिल पवार, केशव मिश्रा जिल्हा समन्वयक (वन हक्क), ना. तह. जी. डी.पोरचेट्टीवार, राकेश डोंगरे, संदीप बडवाईक, राहुल ब्राह्मणकर, ॠषी कुंभारे उपस्थित होते.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारित नियम,2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना कलम 3(१) नुसार वैयक्तिक व सामुहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वन निवासी यांना वैयक्तिक/स्वत:च्या उपजीविकेकरीता शेती करण्यासाठी वन जमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क आहे. तसेच सामूहिक वन हक्कमध्ये निस्तार सारखे हक्क, गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपारिकरित्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करणे, त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क, पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादन, चराई करणे, पारंपारिक मोसमी साधन संपत्ती करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्त्रोताचे संरक्षण, पुनर्निमाण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचे हक्क इ. विविध वनहक्क प्राप्त झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर विविध पात्र शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय वन हक्क समिती द्वारे वैयक्तिक दाव्यांचे पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना वन जमीन चे वन हक्क पट्टे वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी (सामान्य), कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे व कार्यक्रमाचे आभार केशव मिश्रा जिल्हा समन्वयक यांनी मानले.