गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था पशुपालन व शेतीवर अवलंबून असून शेतीसाठी किसान क्रेडीट कार्ड यापुर्वीपासून अंमलात आहे. यापुढे शासनाद्वारे पशुपालन व्यवसाय करीत असतांना आवर्ती खर्चासाठी पशुपालकांना सुध्दा किसान क्रेडीट कार्डचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील पशुपालकांनी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले यांनी केले आहे.
या अनुषंगाने राज्यातील सर्व पात्र पशुपालक शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय आणि वित्तीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 मे 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड राष्ट्रव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. करीता जिल्ह्यातील पात्र पशुपालक, दुग्धव्यवसाय, शेळीपालन व्यावसायिकांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पशुवैद्यकीय संस्थेमार्फत अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. सर्वसाधारण कोणत्याही तारणाशिवाय पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडीट कार्ड कर्ज मर्यादा (खेळते भांडवल) 1 लाख 60 हजार रुपये आहे. परंतु जो पशुपालक शेतकरी सहकारी दुग्ध सोसायटी/ दुग्ध संघ/ दुग्ध उत्पादक कंपनीशी संलग्न आहे आणि कर्ज परत करण्याची त्रिपक्षीय करार (दुग्ध सोसायटी/संघ/बँक अणि शेतकरी) करुन कर्ज परत करण्याची हमी देत असेल त्यावर कोणत्याही तारणाशिवाय 3 लाख रुपयाच्या मर्यादेत पशुसंवर्धन विषयक केसीसी कार्ड योजनेचा लाभ घेता येईल. सदर योजना कोणत्याही पशुधनाच्या खरेदीकरीता नसून त्यांच्या पशुव्यवस्थापनावरील येणाऱ्या आवर्ती खर्चाकरीता आहे.