पुढील सुनावणी 28 मार्चला
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्यातील 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणूकांच्या संदर्भात आज सुनावणी होणार होती.
–तीन वर्षांपासून निवडणुका लांबणीवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आधी करोनामुळे रखडल्या. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे ढकलण्यात आल्या. सवोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जास्तीत जास्त सहा महिने लांबवता येऊ शकतात. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत.
–वॉर्डरचना बदलली तर निवडणुकांचा मार्ग मोकळा
सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारने बदललेली वॉर्डरचना बदलली तर निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. परंतू 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्यांच्या निवडणूका घ्यायच्या आहेत. यामुळे निवडणूक आयोग या निवडणूका दोन टप्प्यात घेऊ शकते. काही पावसाळयाआधी तर काही निवडणूका पावसाळयानंतरही घेतल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.