ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
दोघांचेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
गोंदिया : मार्बतच्या रॅली समोरून कार घेऊन जाणाऱ्या कारचालकाला दोघांनी बेदम मारहाण केली. त्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारकर्त्याला तक्रार देऊ नका म्हणून समजाविण्यासाठी आलेल्या वकील व पोलिसांची आपसांत बाचाबाची झाली. पोलिसांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचे सांगत गोंदिया जिल्हा वकील संघाने गोंदिया शहर पोलिसांच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत सोमवारी (दि.२५) पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
१५ सप्टेंबरला गोंदिया येथे भाजपच्या चित्रा वाघ यांच्या कार्यक्रमाला सडक-अर्जुनी तालुक्याच्या बोथली (खजरी) येथील दोषांतकुमार भुमेश्वर चव्हाण (३२) हे आपल्या नातेवाईकांना घेऊन आले होते. दुपारी १ वाजता साई मंगलम लॉन येथे जेवण केल्यानंतर गावाला जाण्यासाठी ते कारने निघाले असताना छोटा गोंदियाच्या लालबहादूर शास्त्री चौकात मार्बत जात होती. त्या मार्बतच्या मागे दोषांतकुमार चव्हाण यांची कार होती. यावेळी त्यांच्या कारजवळ आलेल्या दोन तरूणांनी दोषांतकुमार यांना शिवीगाळ करत गाडीचे काच खाली करायला लावले. त्यांनी गाडीच्या काचा खाली केले असता आरोपींनी त्यांच्या कानशिलात हाणली. यावर वाद झाल्याने दोषांतकुमार चव्हाण हे तक्रार करण्यासाठी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आले. त्यांच्यासोबत अनिल शालीकराम बिसेन (२६) व पंकज सुरेंद्र चौधरी (२५) दोन्ही रा. छोटा गोंदिया हे आले. त्या दोघांच्या मदतीसाठी प्रकाश ऊर्फ पप्पू हनसराम टेंभरे (३२) व वकील मनिष नेवारे आले होते. झालेल्या मारहाणीची तक्रार करू नका, असे त्या तक्रारकर्त्याला समजावित असताना पोलिसांनी तुम्ही कशाला आले, असे विचारणा केली. त्यात पोलिस आणि वकील यांच्यात बाचाबाची झाली. या संपूर्ण घटनाक्रम शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वकील मनिष नेवारे यांनी ही घटना घडल्यानंतर चित्रफीत तयार करून ती व्हायरल केल्याचा आरोप पोलिसांनी केला. वकिलांच्या मते, पोलिस अधिकारी, कर्मचारी वकीलांसोबत असभ्य वर्तन करत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत सोमवारी (दि.२५) गोंदिया शहरात मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना दिले.
तिघांनी दारू पिऊन पोलिस ठाण्यात घातला धिंगाणा
दोषांतकुमार चव्हाण हे तक्रार करण्यासाठी गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आले. यावेळी आरोपी अनिल शालीकराम बिसेन (२६, रा. विठ्ठल रूखमाई मंदिराच्याजवळ छोटा गोंदिया), पंकज सुरेंद्र चौधरी (२५, रा. हनुमान मंदिराच्याजवळ छोटा गोंदिया) व प्रकाश ऊर्फ पप्पू हनसराम टेंभरे (३२, रा. छोटा गोंदिया या तिघांनी १५ सप्टेंबरला पोलिस ठाण्याच्या आवारात मद्याच्या धुंदीत जोरजोराने ओरडून शांतता भंग केल्यामुळे सहाय्यक फौजदार अनिल पारधी यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार गणवीर करत आहेत.