खा. अशोक नेते यांनी दाखविली हिरवी झेंडी
गोंदिया : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील दुर्गम, मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परंतू महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील महत्वाच्या सालेकसा रेल्वे स्थानकावर अखेर 15231/15232 गोंदिया-बरौनी या एक्सप्रेस रेल्वेगाडीचा थांबा मंजूर करण्यात आला. या थांब्याचा शुभारंभ खा.अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
बरौनी एक्सप्रेस सालेकसा स्थानकावर येताच खा.नेते यांनी चालकाला पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचे तोंड गोड करत स्वागत केले. यानंतर त्यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ४० वर्षांपासूनची रेल्वे प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी खा.अशोक नेते यांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या या रेल्वे स्थानकावर मोजक्याच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील रेल्वे प्रवाशांची अडचण होत होती. मुंबई-कोलकाता या मुख्य मार्गावरील सालेकसा स्थानकावर एक्सप्रेसला थांबा द्यावा यासाठी ४० वर्षांपासून रेल्वे प्रवाशांकडून मागणी केली जात आहे.
दरम्यान या भागातील प्रवाशांसाठी महत्वाच्या असलेल्या बरौनी एक्सप्रेसच्या थांब्यासाठी खा.नेते यांनी रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या थांब्यामुळे कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी अशा सर्व वर्गाची गैरसोय दूर होणार आहे.