Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी उद्या मतदान, मतदान पथक रवाना

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी उद्या मतदान, मतदान पथक रवाना

  • मतदार करणार१८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
  • जिल्ह्यात१२८8 मतदान केंद्रावर होणार मतदान
  • शंभर मीटर परिसरात मोबाईल बंदी
  • ५७१६अधिकारी-कर्मचारी तैनात

गोंदिया: अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ लाख ३० हजार २६५ मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण १८ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील २ लाख ६२ हजार २८१ मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात ५७१६ अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा क्षेत्रात मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत असून तिरोडा व गोंदिया विधानसभा क्षेत्रात सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

जिल्ह्यात एकूण १२८8 मतदान केंद्र आहेत. या सर्व केंद्रावर आज त्या-त्या विधानसभा क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मतदान पथक (पोलिंग पार्टी) रवाना करण्यात आल्या आहेत. मतदान पथकांना ने-आण करण्यासाठी १८१ बसेस व २४१ जीपची व्यवस्था करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदार व ८५ वर्षावरील मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ७२३ व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६४४ मतदान केंद्रावर वेब-कास्टींग संच लावण्यात आले असून विधानसभा मतदारसंघ स्तरावर व जिल्हास्तरावर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. सध्या विदर्भात उन्हाचे वाढते प्रमाण पाहता १९ एप्रिल शुक्रवार मतदानाच्या दिवशी हिट वेव्हच्या (उष्णतेची लाट) अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल व कॅमेरा डिव्हाईस नेण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला आहे. मतदारांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. उमेदवारांची संख्या १६ किंवा त्यापेक्षा कमी असल्यास एकाच बॅलेट युनिटवर मतदान घेता येते. मात्र १६ पेक्षा जास्त उमेदवार निवडून रिंगणात असल्यास प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागतो. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या १८ असल्यामुळे निवडणूक विभागाने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक विभागाने पूर्ण तयारी केली असून आज निवडणूक मशीन रवाना करण्यात आल्या.

         विधानसभा मतदारसंघ निहाय लागणाऱ्या मतदान यंत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र ३१९, कंट्रोल युनिट ३१९, व्हीव्हीपॅट ३१९ व बॅलेट युनिट ३१९ अधिक ३१९ (६३८), तिरोडा विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र २९६, कंट्रोल युनिट २९६, व्हीव्हीपॅट २९६ व बॅलेट युनिट २९६ अधिक २९६ (५९२) व गोंदिया विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र ३६२, कंट्रोल युनिट ३६२, व्हीव्हीपॅट ३६२ व बॅलेट युनिट ३६२ अधिक ३६२ (७२४) यंत्र मतदानासाठी लागणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments