रस्त्याचे काम संथगतीने : धुळीमुळे नागरिकांना त्रास
गोंदिया : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर साकोली ते शिरपूरबांध या महामार्गावरील पुलाचे बांधकाम एका ग्लोबल कंपनीतर्फे मागील दोन वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून रस्ता पूर्णतः खोदण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट निर्माण होत असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
या मार्गावर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी यासह मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामधून निर्माण होणारी धूळ ही घातक सिद्ध होत आहे. तसेच महामार्गावरील प्रशस्त पुलाच्या बांधकामात मोठ्या वाहनांचा वापर होत आहे. मुरूम, खडी आणण्यासाठी असंख्य ओव्हरलोड टिप्पर या ठिकाणी धावत आहेत. मात्र, यामधून धुळीचे निर्माण होणारे लोट इतर वाहनचालकांच्या जिवावर उठले आहेत. मुळात रस्ता खोदलेल्या ठिकाणी मुरूम भरणा करण्यात आला आहे. परंतु, त्यावर नियमित पाणी टाकले जात नाही. वातावरणात उडणारी धूळ तासन्तास खाली येत नाही. त्यात वाहनांची सातत्याने होणारी वाहतूक या मार्गावर मातीची पावडर नागरिकांवर फवारत आहे. देवरी तालुक्यातील शिरपूरबांध महामार्गावरील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजून साधारण दोन वर्ष या मार्गाचे बांधकाम सुरू राहणार आहे. त्या प्रमाणात संबंधित अधिकाऱ्यांचे या बांधकामावर लक्ष दिसत नाही. तातडीने या मार्गावर होणाऱ्या बांधकामाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राखाच्या ढिगारामुळे ही त्रास
कोहमारा ते शिरपूरबांध महामार्गावरील पुलाचे बांधकाम मागील दोन वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या बांधकामामुळे वाहन चालकांना एकेरी रस्ताच उपलब्ध आहे. त्यात ओव्हरलोड रेतीचे व मुरूमाचे टिप्पर याच मार्गावरून ये-जा करतात. सोबत पुल बांधकामाकरिता राखेचे मोठमोठे ढिगारे टाकण्यात आले आहेत. यामुळे त्रास वाढला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने व विभागाने तातडीन याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
श्वसनाच्या आजाराची शक्यता
महामार्गावर पुलाचे बांधकाम सुरू असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मार्गावरील धूळ नागरिकांच्या नाका व तोडाद्वारे शरीरात प्रवेश करत असून श्वसनाच्या आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नसून आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.