शंभरावर बुकी, कोट्यवधीची माया
गोंदिया : ऑनलाइन गेमिंग फसवणूक प्रकरणी नागपूर पोलिसांनी २२ जुलैला गोंदियातील सट्टाकिंग सोन्टू जैन याच्या घरावर धाड टाकून १६ कोटी रुपये रोख, १५ किलो सोने आणि २०० किलो चांदी जप्त केली. सोन्टू जैन हा दहा-बारा वर्षांपासून या व्यवसायात सक्रिय असून त्याने राज्यासह बाहेरही नेटवर्क तयार केले. त्याने जिल्हा व जिल्ह्याबाहेर शंभरावर छोटेमोठे बुकी तयार केल्याची माहिती आहे.
गोंदिया जिल्ह्यात काही वर्षांपासून क्रिकेट तसेच ऑनलाइन गेमिंगचा सट्टा वाढला आहे. यामध्ये तरुण आणि अल्पवयीनांना टार्गेट केले जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चार महिन्यांपूर्वीच उघडकीस आणला होता. शनिवारी नागपूर पोलिसांनी मुख्य म्होरक्यावर कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. सोन्टूने या व्यवसायातून पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची माया जमविली, सट्ट्यातून मिळालेली कमाई तो व्याजाने पैसे देण्यासाठी गुंतवित असे.
४० कोटींची जमीन खरेदी
सोन्टूने अलीकडेच गोंदिया-बालाघाट मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ४० कोटी रुपयांची जमीन खरेदी केली. तर आतापर्यंत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी जमीन खरेदीच्या शंभरावर रजिस्ट्री केल्याची माहिती आहे.