ब्रिजभूषणसिंहला अटक करण्याची मागणी : पंतप्रधानांना निवेदन
गोंदिया : राष्ट्रीय कुस्तीपटू संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषणसिंह यांनी आपला लैंगिक शोषण केला असल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला. त्याकरिता त्यांचे दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. गोंदिया येथील खेळाडू, वकील, खेळ प्रशिक्षक, विविध सामाजिक संघटनांनी देखील येथील प्रशासकीय भवनासमोर धरणे देत दिल्लीतील आंदोलनाला समर्थन दिले. दरम्यान ब्रिजभूषणसिंह याला पदावरून काढून अटक करण्यात यावी. कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.
लैंगिक शोषणाच्या विरोधात काही दिवसांपासून कुल्तीपटूंचे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असतानाच कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ गोंदियात प्रशासकीय भवनासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी, ओबीसी संघटना आणि शहरातील खेळासी संबंधित प्रतिनिधी सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक पदके पटकावून आपल्या देशाची शान उंचावणारे कुस्तीपटू आंदोलन करीत आहेत. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण व अत्याचार करणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कुस्तीपटूंचे हे आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंवरील अन्याय, अत्याचार भारतीय संविधानाने त्यांना दिलेल्या प्रतिष्ठेने जगण्याच्या हक्काची पायमल्ली तर आहेच, पण आपल्या भारतीय संस्कृतीवर कलंकसुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून भारताचे भूषण ठरलेल्या महिला खेळाडूंवर झालेले अत्याचार ही बाब अतिशय गंभीर, संतापजनक आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की निषेधार्ह अशीच आहे. अन्याय-अत्याचाराविरोधात लढा देत असलेल्या महिला कुस्तीपटूंसोबत उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे यावेळी उपस्थितानी सांगितले. दरम्यान ब्रिजभूषणसिंह यांना अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले. यावेळी प्रा. सविता बेदरकर, कैलाश भेलावे, मनोज मेंढे, रमेश ब्राम्हणकर, अनील सहारे, डी. एस. मेश्राम, रुपाली उके, जयकुमार, मालती किन्नाके, हेमलता आहाके, राजू मेंढे, अॅड. नरेश शेंडे, अॅड. देवानंद वंजारी, दीपक उके, एम. जी. टेंभूर्णीकर, सोनिया बनसोड, गायत्री सोनवाने, सायली गोस्वामी, धनेंद्र भूरले आदींचा समावेश होता.
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला समर्थन
RELATED ARTICLES