शाळा परिसरातील तंबाखुजन्य विक्री दुकानांवर होणार कारवाई
गोंदिया : राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारे स्वच्छ मुख अभियान मौखिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरत असून मौखिक आरोग्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समिती व सनियंत्रण समितीची सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, दंत शल्यचिकित्सक ग्रामीण रुग्णालय गोरेगाव प्रणव शेलार, जीएसटी कार्यालयाचे राज्यकर अधिकारी नरेश मडावी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोटपा कायदा 2003 अंतर्गत तंबाखुजन्य अभियान राबविण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस इत्यादी ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली असून नगर परिषद हद्दीतील अशा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस व आरोग्य विभागाला दिले.
शाळा-महाविद्यालयांपासून 100 मीटर पर्यंत आढळणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री दुकानदारांवर कोटपा कायदा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात यावी. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. आजही अनेक नागरिक गुटखा, खर्रा, तंबाखू, मावा, पानमसाला इत्यादीचे सेवन करीत असल्याने अशा प्रकारच्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील सेवन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने तंबाखूच्या दुष्परिणाबाबत लोकांचे समुपदेशन करुन व्यवनाधीनतेपासून परावृत्त केले तर मोठ्या प्रमाणात जनजागृती होवून मौखिक आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कोटपा कायदा 2003 अंतर्गत 2023-24 मध्ये 194 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांचेकडून 28 हजार 400 रुपये वसुल करण्यात आले. जिल्ह्यातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव, ग्रामीण रुग्णालय गोरेगाव व ग्रामीण रुग्णालय देवरी येथे तंबाखू मुक्ती समुपदेशन कक्ष तयार करण्यात आले आहे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थेमध्ये मौखिक स्वच्छता, मौखिक आरोग्य व तंबाखू मुक्त मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखूचे व्यसन सोडणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येत आहे.
तंबाखु मुक्त शाळा करण्याकरीता विविध शाळांमध्ये त्यांच्या स्तरावर घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करुन 3 उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करुन तंबाखु मुक्तीचे चिन्ह असलेले स्कूल बॅग वितरीत करण्यात येत आहे. माहे एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत आतापर्यंत 3819 लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात 39 तंबाखु मुक्त आरोग्य संस्था असून समुपदेशनाद्वारे 31 लोकांनी तंबाखूचे व्यसन सोडले आहे. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिबिरे घेऊन जनजागृती करण्यात येत असून गरजु लोकांना फिक्स दात बसवण्याची सुविधा सुध्दा देण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. सभेला समुपदेशक सुरेखाआझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या संध्या शंभरकर, दिलीप बघेले उपस्थित होते.
मौखिक आरोग्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती आवश्यक : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
RELATED ARTICLES