गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आठ हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यापासून मानधन मिळत नसल्याने 14 मार्चपासून सदर कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत काम बंद संप पुकारला होता. अखेर जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांनी त्वरित मानधन काढून देण्याचे ठोस आश्वासन दिल्याने 28 मार्चला सदर हात पंप यांत्रिक कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
अर्जुनी मोरगाव पंचायत समिती अंतर्गत तालुक्यात एकूण 1074 हात पंप आहेत. त्या हातपंपाची देखभाल दुरुस्ती पंचायत समिती स्तरावर होत असते. सदर कर्मचाऱ्यांना मानधनाची रक्कम जिल्हा परिषद गोंदिया मधून केली जाते. सदर हात पंपाच्या देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तालुक्यात पंचायत समिती स्तरावर आठ हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. सदर कर्मचाऱ्यांना पंचायत समिती व गोंदिया जिल्हा परिषदेच्या उदासीन धोरणामुळे आठ हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांचे जुलै 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण आठ महिन्याचे 15 लाख 36 हजार रुपयाचे मानधन अजून पर्यंत मिळाले नाही. तसेच सहा जानेवारी 2022 ते जुलै 2022 पर्यंतचे पंचायत समितीकडून सहा महिन्याची वजा मानधनाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
याच नैरास्येतून तालुक्यातील आठ हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून काम बंद आंदोलन उभारून पंचायत समिती समोर बेमुदत संप सुरू केला आहे. या संपामध्ये एम. के. औरासे, एम एच हुमणे, एम.डी. येडाम, एस. एस. शेडमाके, एम. एन. उईके, आर.डी. रामटेके, जी. आर. लेंडे, वाय .एल. लांजेवार या आठ हात पंप यांत्रिक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
सदर संप हा जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती अर्जुनी मोरगाव स्तरावरील असल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रचना गहाणे यांनी सदर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाची दखल घेत आंदोलन स्थळी भेट देऊन पंचायत समिती स्तरावरून गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्वरित तीन महिन्याचे वेतन आपल्या स्तरावर काढून द्यावे अशा सूचना केल्या. उर्वरित मानधन जिल्हा परिषद गोंदिया स्तरावरून काढून देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच अन्य समस्याही प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिल्याने अखेर 28 हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला.
रचना गहाणे यांच्या आश्वासनाने हातपंप यांत्रिक कर्मचाऱ्यांचा संप मागे
RELATED ARTICLES