गोंदिया : गोंदिया येथील रेल्वे उडान पुलाचे बांधकाम म्हणजे गोंदिया वासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आमदार विनोद अग्रवाल व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने या उडान पुलाची मंजुरी प्रदान करण्यात आली होती. आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन करून तत्काळ कामाला सुरुवात करण्याचे आदेश सुद्धा संबंधित विभागाला देण्यात आले होते. तरीही कंत्राटदार व संबंधित विभागाकडून काम सुरु करण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याने नागरिकांनी परत आमदार विनोद अग्रवाल यांच्या कडे धाव घेतली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. एवढे परिश्रम आणि विविध परवानग्या मिळवून कामाला मंजुरी मिळवून देण्यात आली तरीही अद्याप काम सुरु न झाल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव अधिकाऱ्यांना नाही असेही यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी सुनावले.
काही दिवसात परत पावसाळा सुरु झाला म्हणून काम बंद केले जाईल यापेक्षा किमान काम सुरु झाले असते तर अद्याप दोनही बाजूने पुलाचे बांधकाम झाले असते. परंतु असे न करता काम सुरु सुद्धा झाले नाही. यामुळे आमदार विनोद अग्रवाल संतापले होते.
अन्यथा करणार आंदोलन !
कामात जी दिरंगाई झाली ती झाली परंतु जर या कामाला ८ दिवसाच्या आत सुरुवात झाली नाही तर आंदोलनाची भूमिका घेतली जाईल. साखळी उपोषणाच्या माध्यमाने सुरुवात करून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी केले असून आम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज पडू देवू नका असेही यावेळी ते बोलले.