गोंदिया : कृषी विभागाद्वारे मंजूर भात मळणी मशिनची पाहणी करुन अनुदान मिळवून देण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी 2 हजार रुपये लाच घेणाºया गोरेगावच्या कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 4 फेब्रुवारी रंगेहाथ पकडले. दिगंगर वैकुंठराव ठाकरे असे त्याचे नाव आहे.
तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्याच्या वडीलोपार्जीत शेतजमिनीपैकी बहिणीला दिलेली एक एकर जमीन तो स्वत: करतो. शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत भात मळणी मशिन मंजूर झाली असून प्रशासकीय प्रक्रिया करुन मशिन खरेदी केली आहे. दरम्यान मशिनची मौका तपासणी अनुदानाकरिता वरिष्ठांना अहवाल पाठविण्यासंदर्भात त्यांनी कृषी पर्यवेक्षक दिगंबर ठाकरे यांच्याशी संपर्क केला. प्रसंगी ठाकरे यांनी मशिनची तपासणी करुन कोणतीही त्रुटी न काढता अनुदानाकरिता वरिष्ठांना अहवाल पाठविण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारकर्त्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. त्याआधारे 4 फेब्रुवारी रोजी एसीबी पथकाने देऊटोला येथे तक्रारकर्त्याच्या शेतात सापळा रचून ठाकरे याला तक्रारकर्त्याकडून 2 हजार रुपयांची लाच घेताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. त्याच्या गोरेगाव पोलीस ठाण्यातंर्गत भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोनि अतुल तवाडे, सफौ विजय खोब्रागडे, पोहवा संजय बोहरे, मंगेश कहालकर, नापोशि संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, संगीता पटले, दीपक बाटबर्वे यांनी केली.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219