पक्षकारांनी केले समाधान व्यक्त
गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 13 हजार 837 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. यावेळी 5 कोटी 50 लाख 73 हजार 492 रुपये एवढी वसुली झाली.
अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे, एस. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. व्ही. पिंपळे यांचे मार्गदर्शनाखाली 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे तसेच जिल्हयातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकाराच्या तडजोड पात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच विद्युत व बँक लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण न्यायालयात प्रलंबित दिवाणी 517 प्रकरणांपैकी 99 प्रकरणे निकाली काढण्यात आली व यामध्ये रुपये 1,26,63,970 वसुलींचे प्रकरणे निकाली निघाले. न्यायालयात प्रलंबित 3022 फौजदारी प्रकरणांपैकी 1935 प्रकरणे निकाली काढण्यात आली व रुपये 2,70,29,776 वसुलींचे प्रकरणे निकाली निघाली. तसेच लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेले पुर्वन्यायप्रविष्ठ 39,155 प्रकरणांपैकी 12,611 प्रकरणे निकाली काढण्यात आली व यामध्ये रुपये 1,53,79,746 रूपयांची वसुली झाली. एकूण ठेवलेल्या प्रकरणापैकी 13 हजार 837 प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकूण रुपये 5 कोटी 50 लाख 73 हजार 492 एवढी वसुली झाली.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219