गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीने लोकसहभागातून एका मिनिटात एक हजार केशर आंबा लागवडीचा नवा विक्रम केला आहे. या अभिनव संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.
डार्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर निधीतून तसेच सप्रेम संस्था, नवदृष्टी संस्था आणि गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेच्या पुढाकारातून सदर ग्रामपंचायतीला केशर आंब्याची १ हजार रोपे निःशुल्क उपलब्ध करण्यात आली. या रोपांची थेट गुजरात वरून आयात झाली असून मँगो कप स्पर्धेअंतर्गत सदर वृक्षारोपण करून ग्रामपंचायत यात सहभागी झाली आहे. दरम्यान एक हजार झाडे एका मिनिटात लावण्याच्या टार्गेट घेऊन २७ जुन रोजी अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात नियोजित वेळेत शाळेतील मुली व महिलांच्या सहयोगाने १ हजार वृक्ष लागवड एकाच वेळी १ मिनिटांच्या आत ४० शेंकदात करण्यात आली. येथील सरपंच योगेश्वरी सी. चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. यशस्वितेसाठी जि.प.सदस्य भुमेश्वर पटले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, सडक अर्जुनी पं.स. सभापती चेतन वडगाये, पं.स.सडक अर्जुनी चे सर्व विभागाचे कर्मचारी,सडक अर्जुनी च्या तहसीलदार गोमासे मॅडम,वनविभागाचे राउंड ऑफिसर गोटाफोडे व कर्मचारी वर्ग, सामाजिक वनीकरण कर्मचारी वर्ग, कृषी विभाग, ग्रामपंचायत डव्वा चे उपसरपंच सुनील घासले सर्व ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी वर्ग, गावातील महिला, माविम बचत गटाच्या महिला, उमेदच्या महिला, कृषी बचत गट, गावातील शेतकरी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते व गावातील वृक्ष प्रेमी समस्त ग्रामवासी, जि.प. शाळा डव्वा चे विद्यार्थी,शिक्षक वृंद,आदिवासी शिव विद्यालय डव्वा येथील विद्यार्थी, शिक्षक वृंद, आश्रम शाळा डव्वा येथील विद्यार्थी,शिक्षक वृंद, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा येथील विद्यार्थी व शिक्षक वृंद, डव्वा लगत असलेल्या खजरी शाळेतील विद्यार्थीनींनी, विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद,गोपालटोली येथील मा.सरपंच व गावकरी,पळसगाव येथील मा.सरपंच व गावकरी या सर्व वृक्ष प्रेमी यांचे सहकार्य लाभले.
महिलांचे विशेष योगदान!
एका मिनिटात एक हजार केशर आंबा वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला सर्वच गटातून सहकार्य लाभले असले तरी हिरवे वस्त्र परिधान करून पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या नारीशक्तीचे विशेष योगदान लाभले. यात अधिकारी कर्मचारी गटापासून ते मजूर महिला अशा सर्वच गटातील महिलांचा विशेष सहभाग राहिला आहे.