गोंदिया : तिरोडा येथील बसस्थानकासमोर रस्त्यावर तुटलेले दुभाजक अपघाताला निमंत्रण देत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चुन बनवलेले दुभाजक निकृष्ट दर्जाचे असून, त्याच्या दुरवस्थेमुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांनी या दुभाजकांची त्वरित दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर हे दुभाजक बनविताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी हे दुभाजक तुटलेले व विस्कळीत अवस्थेत असून रहदारीला अडथळा होत आहे. वाहनचालकांना या अडथळ्यांमुळे अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. काही घटनांमध्ये दुचाकीस्वार या तुटक्या दुभाजकांवर आपटून जखमी झाले आहेत. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतर करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ असे नाव देण्यात आले. परंतु, तिरोडा परिसरातील या रस्त्यावरील काम पूर्णपणे ढिसाळ असल्याचे चित्र आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करण्याचे प्रयत्न केले. परंतु, याबाबत कोणतीही स्पष्ट यंत्रणा उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी संघटनांनी या विषयाकडे लक्ष वेधून घेतले असून प्रशासनाने तात्काळ योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे रस्त्यावरील दोष झाकले जातात व वाहनचालक अचानक अडथळ्याला धडकतात. त्यामुळे जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. याच भागातून विद्यार्थी, वृद्ध नागरिक व महिला देखील मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. दुभाजकाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबत काही अभियंत्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांचा रोष आता उफाळून आला आहे. रस्त्याच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुटलेले दुभाजक हे धोकादायक झाले आहेत.
तिरोडा बसस्थानकासमोरील दुभाजक ठरतो धोकादायक
RELATED ARTICLES






