गोंदिया : भरधाव जाणार्या प्रवासी खासगी बसमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया-बालाघाट मार्गावर शहराजवळील कटंगीकला येथील हॉटेल जिंजरसमोर घडली. बुलेंद्रा झनकलाल पटले (29, रा. दडी, ता. किरणापूर, जि. बालाघाट मप्र) असे मृताचे नाव आहे.
रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक ए. आर. 11 बी 4381 ही गोंदिया येथून बालाघाटच्या दिशेने प्रवासी घेऊन निघाली. बस प्रवाशांनी भरगच्च भरून होती. दरम्यान, भरधाव असलेल्या बसच्या चालकाने ब्रेक लावला असता प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला बुलेंद्रा पटले याचा तोल गेला आणि तो बस खाली पडला. यातच बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस शिपाई चंद्रकुमार बोपचे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. आरोपी बसचालक तौशिक नजीर मोहम्मद खान (35, रा. लालबर्रा जांब, जि. बालाघाट) याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक देशमुख करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, गोंदिया-बालाघाट मार्गासह इतरही प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. ज्या वाहनांना प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे, ती वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेतात. परिणामी, अनेकदा अपघात घडत असतात. मंगळवारी झालेल्या घटनेतही प्रवासी बसमध्ये क्षमतेपेक्षा 20 ते 25 प्रवासी अधिक होते. बसायला जागा नसल्याने बुलेंद्रा पटले हा बसच्या प्रवेशद्वाराजवळ उभा होता. चालकाने ब्रेक लावल्याने तो खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. क्षमतेपेक्षा अधिक व विना परवाना प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर पोलिस व परिवहन विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणार्या वाहनांची संख्या काही कमी नाही. मात्र, चिरीमिरीपोटी पोलिस व परिवहन विभाग त्यांना खुली सुट देत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवासी वाहनचालक निर्ढावले आहेत. याचाच परिपाक म्हणून बुलेंद्रासारखे काहीजण अपघातात बळी पडतात. आतातरी विभागाने अशा वाहनांवर किंबहुना चालकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
प्रवासी बसमधून पडून तरुणाचा मृत्यू, कटंगीकला येथील घटना
RELATED ARTICLES






