गोंदिया : जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, सर्वसमावेशक सनियंत्रण समितीची आढावा सभा आज जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी विविध विषयांवर कामकाजाचे सादरीकरण केले. सदर आढावा सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, पोलिस उपअधीक्षक नंदिनी चानपुरकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी संदीप पटले, बाल कल्याण समितीचे श्री जाधव, देवका खोब्रागडे, जयश्री कापगते, वर्षा हलमारे, अल्का बोबडे, मनोजकुमार रहांगडाले, वंदना दुबे, पुजा डोंगरे, परिविक्षा अधिकारी अनिल बांबोळे, संरक्षण अधिकारी मुकेश पटले, मनिषा चौधरी, धर्मेंद्र भेलावे, अशोक बेलेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा बाल संरक्षण समिती, सर्वसमावेशक सनियंत्रण समिती आणि चाईल्ड हेल्प लाईन त्रैमासिक बैठकीचे सादरीकरण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी केले, तर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष देवका खोब्रागडे यांनी बाल कल्याण समिती अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाचे सादरीकरण केले. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत एकूण 28 प्रकरणांचे गृहचौकशी करून बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. 38 बालकांना बाल कल्याण समिती अंतर्गत पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दत्तक प्रक्रियेअंतर्गत एकूण 4 प्रकरणांची गृहचौकशी करून आयुक्तालयाला अहवाल सादर करण्यात आला. त्याचबरोबर एकूण 40 बालकांचे समुपदेशन करण्यात आले व 3 बालकांना त्यांच्या स्थानिक राज्यात स्थानांतर करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले तर 12 बालकांचे आंतरराज्य/जिल्हा स्थानांतरण करण्यात आले आहे.
बालकांसंबंधित विविध कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर 02, ग्रामस्तरावर 38 प्रशिक्षणे घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत या ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. चाईल्ड हेल्प लाईनच्या टोल फ्री क्रमांक 1098 यावर एकूण 63 कॉल प्राप्त झाले असून सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करून त्याचे निराकरण करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यादरम्यान 5 बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. चाईल्ड हेल्प लाईन गोंदिया कक्षाकडून बाल कल्याण समिती गोंदिया येथे 9 बालके सादर करण्यात आली आहेत तसेच 19 बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आढावा बैठकीदरम्यान बालकांच्या संरक्षणाबाबत योग्य ती काळजी घेण्याची कार्यवाही, रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे प्रवासात फिरत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत करावी तसेच चाईल्ड हेल्प लाईन 1098 चा जिल्हयात जास्तीत जास्त प्रसार करण्यात यावा व व्हाटसॲप ग्रुप तयार करण्यात यावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. बालविवाह, बालकामगार रस्त्यांवर भटकणारी मुले, लैंगिक अत्याचार तसेच संकटात सापडलेल्या बालकांबाबत माहिती चाईल्ड हेल्प लाईन 1098 या क्रमांकावर देण्यात यावी किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
महिला व बाल विकास विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
RELATED ARTICLES