रजेगावच्या कोरणी घाटावर स्व.अजित पवारांना अखेरचा निरोप, वैनगंगेच्या पवित्र पात्रात लोकनेत्याच्या स्मृती विलीन

0
201

गोंदिया. ​राज्याचे लोकप्रिय व लाडले जननेता माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थीं कलशाचे आज गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव येथील वैनगंगा नदीच्या पवित्र पात्रात अत्यंत भावूक वातावरणात विसर्जन करण्यात आले. ‘अजित दादा अमर रहे’ च्या जयघोषात आणि साश्रू नयनांनी असंख्य नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अंतिम निरोप दिला. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत गोंदियाच्या राष्ट्रवादी भवन येथे अस्थी कलश दर्शन आटोपल्यानंतर, हा पवित्र अस्थी कलश एका सजवलेल्या वाहनातून शोक यात्रेच्या स्वरूपात रजेगावच्या दिशेने रवाना झाला. रजेगाव येथील कोरणी घाटावर अस्थी कलश पोहोचताच वातावरण अधिकच गंभीर झाले. वैनगंगा नदीच्या तीरावर मंत्रोच्चारांच्या घोषात आणि पूर्ण धार्मिक विधीनुसार अस्थींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर या पवित्र अस्थींचे वैनगंगेच्या पवित्र पात्रात विसर्जन करण्यात आले.
​यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरणी घाटावर गर्दी केली होती. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृती वैनगंगेच्या प्रवाहात विलीन होताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. “दादांच्या रूपाने विकासाचा एक अध्याय संपला असला, तरी त्यांचे विचार या मातीत सदैव जिवंत राहतील,” अशी भावना यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here