गोंदिया : अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती करुन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा असून रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यातील रस्त्यावर असणाऱ्या अपघात प्रवण स्थळांची संख्या कमी करण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी अपघात प्रवण स्थळे आहेत त्या ठिकाणी कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित सादर करावा. मद्य प्राशन करुन वाहन चालविणे तसेच दुचाकीवर ट्रीपलशीट प्रवास करणाऱ्यांवर पोलीस विभागाने योग्य ती कारवाई करावी. शहरात रस्त्यावर मोकाट जनावरे फिरतांना दिसतात त्यावर नगरपरिषदेने योग्य ती उपाययोजना करावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यांवर दिशादर्शक व माहितीदर्शक फलक लावण्यात यावे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना वाहतूक नियमांची माहिती असणे गरजेचे आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. विशेषत: शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला-मुलींमध्ये प्रामुख्याने जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग व परिवहन विभागाने समन्वयातून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
रस्ता सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी प्रजित नायर
RELATED ARTICLES