वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीचा घेतला जीव; परिसरात दहशत

0
283

गोंदिया : वडीलांसोबत शेतात गेलेल्या बालिकेवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे घडली. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालिकेला गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला. रुची देवानंद पारधी (वय ९वर्ष) रा. इंदोरा निमगाव असे मृतक बालिकेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार शनिवारी दुपारी रुचा ही तिच्या वडीलांसोबत शेतावर गेली होती. वडील ताराचे कुंपन लावण्याचे काम करीत होती. तर रुची ही शेतातील बांधीत उभी होती. दरम्यान दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करुन तिला काही अंतरावर फरफटत नेले. रुचीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील व आजुबाजुच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांना आरडाओरड केली. यानंतर बिबट्याने रुचाला सोडून देत जंगलाच्या दिशेने पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुचाला तिचे वडील शेतकऱ्यांनी त्वरित स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान रात्री ८ वाजता तिचा मृत्यू झाला.

 

पंधरा दिवसांपासून बिबट्याने घातला धुमाकूळ

तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव, सुकडी डाकराम परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी परिसरातील गावकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here