गोंदिया : गेल्या १९ जुलैपासून येथे व परिसरात मुसळधार पावसाने शेत शिवारातील धान पिक नष्ट केले. गेल्या आठ दिवसापासून पाऊस काही थांबेना आजही पावसाची रिपरीप दिवसभर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे येथे व परिसरात नदी नाल्यांना पूर आल्यामुळे येथील,परिसरातील व अर्जुनी मोर तालुक्यातील शेतकरी पुरता बरबाद झाला आहे.
नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे शेतकरी राजा खचून गेला,हातचे पीक निघून गेले,ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती परिसरात आहे. हेही आता कमी झाले की काय, म्हणून जंगली हत्तींचा प्रवेश परिसरात झाल्याची माहिती आहे. हत्तीच्या आगमनाच्या वार्तेने नवेगावबांध व परिसरात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे पुरातून जे काही बचावले आहे,असेही पीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.गेल्या तीन-चार वर्षापासून हत्तींचा सुळसुळाट या परिसरात व तालुक्यात होतो. शेतीची प्रचंड नुकसान या हत्तींच्या कळपांनी यापूर्वीही केलेली आहे. एकच हत्ती दिसल्याची सध्या वार्ता आहे. हा एकच हत्ती भटकलेला असावा की हत्तीच्या कळप आहे? याबाबत अजून पुरेशी माहिती मिळाली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक दहशत निर्माण झाली आहे. सर्व काही निसर्गाने नेले, आता हत्तीचे कळप शेतात असलेल्या उभ्या पिकाचे नुकसान करणार,यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.पुरानंतर हत्तीच्या कळपांची एक नवीनच दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार ,नवेगावबांध परिसरात डेपो, ओव्हर फ्लो कडील टोली वसाहत परिसरात हत्ती आल्याची सुचना मिळाली आहे. हत्ती एकच दिसल्याचे सांगितले जात आहे.काही लोकांनी सदर हत्तीच्या पाऊलखुणा पाहिल्याचे सांगितले आहे. सदर हत्ती हा नवेगावबांध हेलिपॅड ग्राउंड मार्गे पलटूदेव पहाडी कडील शेतातून कापगते यांच्या ऊसवाडी कडून जंगलात गेल्याचे वनविभागाच्या सूत्रा कडून माहीती मिळाली आहे. गावातील लोकांना सतर्क राहावे तसेच शेतात जातांनी गटागटांमध्ये सावधरित्या जावे, कुठलीही हरकती करू नये, हत्तीच्या जवळ जाऊ नये त्याला चिथावण्याचा प्रयत्न करू नये, हत्ती बिथरतील असे कुठलेही कृत्य नागरिकांनी करू नये. असे वन विभाग व स्थानिक महसूल विभागाकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे.
नवेगावबांध येथे मुसळधार पावसानंतर, आता हत्तीचे आगमन
RELATED ARTICLES