मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना निविष्ठा व साहित्य वाटप
गोंदिया : मानवाच्या आहारात मासे खाणे शरिराला पोषक असते. माश्यांची गुणवत्ता चांगली असेल तर त्याची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळण्यासाठी मासोळीची प्रत टिकविणे गरजेचे आहे, असे मत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कैलास मारबते यांनी व्यक्त केले.
सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली येथे 7 नोव्हेंबर रोजी सुक्ष्म प्रकल्प योजनेअंतर्गत तलावात मत्स्योत्पादन वाढीसाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना निविष्ठा व साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयो जित करण्यात आला होता, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास समन्वयक महास्ट्राईट विपुल फडतरे, फायनान्शीयल तज्ञ महास्ट्राईट वरुण सिंग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व जिल्हा विकास आराखडा सन 2025-26 अंतर्गत सुक्ष्म प्रकल्प योजनेअंतर्गत तलावात मत्स्योत्पादन वाढीसाठी आवश्यक निविष्ठा व साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा नियोजन अधिकारी, गोंदिया यांचे सहकार्याने मत्स्यव्यवसाय विभाग गोंदिया यांनी आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रम सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कैलास मारबते यांचे अध्यक्षतेखाली तसेच समन्वयक महास्ट्राईट विपुल फडतरे, फायनान्शीयल तज्ञ महास्ट्राईट वरुण सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे स्वरुप व उद्देश सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यसाय कैलास मारबते यांनी विस्तृतपणे विशद केले. तसेच समन्वयक महास्ट्राईट विपुल फडतरे यांनी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मत्स्यव्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. सदर योजनेअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील एकूण 07 संस्थांना मत्स्यखाद्य, मत्स्यजाळे, शितपेटी, प्लॅस्टीक क्रेटस व कैनवस टेंट इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्याचा उपयोग मासोळी वाढीसाठी, मासे पकडण्यासाठी, मासोळीची प्रत टिकविण्यासाठी तसेच दर्जेदार मासे बाजारात उपलब्धतेसाठी करावे. त्यामुळे मत्स्योत्पादन वाढीस चालना मिळेल, असे आवाहन यावेळी मत्स्यव्यवसाय संस्थांना करण्यात आले.
मत्स्यव्यवसायाला चालना मिळण्यासाठी मासोळीची प्रत टिकविणे गरजेचे : कैलास मारबते
RELATED ARTICLES






