जिल्हा आरोग्य विभागाचे सर्वेक्षण 17 नोव्हेंबरपासून ते 2 डिसेंबरपर्यंत
गोंदिया : कुष्ठरोगाबाबतचे सामाजिक गैरसमज दूर करून नागरिकांनी स्वपुढाकाराने जिल्ह्यात 17 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणास सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आज झालेल्या बैठकीत केले. राष्ट्रीय निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. सदर अभियाना दरम्यान नागरिकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करुन आपली आरोग्य तपासणी करावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज कुष्ठरुग्ण शोध मोहिमेबाबत समन्वय समिती सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबविण्यात येणारी शोध मोहीम ही आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या मोहिमेद्वारे रुग्णांचा वेळेवर शोध घेऊन उपचाराची तत्काळ आणि मोफत सोय करण्यात येईल. समाजात कुष्ठरोगाबाबत असलेला गैरसमज व भेदभाव दूर करण्यासाठी जनजागृती आवश्यक असून नागरिकांनी जिल्हा आरोग्य विभागास सहकार्य करावे.
कुष्ठरोगाची कुठलीही लक्षणे आढळल्यास न लपवता घरी येणाऱ्या पथकाला सांगावीत. शासनाचे प्रतिनिधी म्हणून घरोघरी जाणाऱ्या पथक सदस्यांनी संवेदनशीलपणे आढळलेल्या प्रकरणांना हाताळावे, असे प्रशिक्षण पथक सदस्यांना देण्यात येण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिले.
सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय यांनी कुष्ठरोग शोध मोहिमेचे सादरीकरण सांगितले. पूर्व विदर्भातील गोंदियासह उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगांचे प्रमाण आढळून येते. हे प्रमाण दर 10 हजारी 1 पेक्षा कमी करणे, कुष्ठरोग विकृती दर्जा 2 प्रमाणे शून्य आणणे, कुष्ठरोगाबाबत असलेली अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे, कुष्ठरोगाबाबतची जनजागृती ग्रामीण व शहरी भागातील तळागाळापर्यंत पोहोचविणे, कुष्ठरोगमुक्त भारत हा संकल्प साध्य करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
महात्मा गांधी यांनी कुष्ठरोग आणि कुष्ठरोग्यांबाबतची जागरूकता समाजात निर्माण करण्यासाठीचा प्रण घेतलेला होता. त्यांनी त्यांच्या हयातीत कुष्ठरोग्यांची सेवा केलेली आहे. कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रोगमुक्त झालेल्यांचे मनोगत, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा, शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञांचे वाचन, शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोग बाबतचे संदेश, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, कटपुतली, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच कुष्ठरोग दौड मॅरेथॉनचे आयोजन इत्यादी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टर धनविजय यांनी दिली.
कुष्ठरोगाबाबतचे सामाजिक गैरसमज दूर करून नागरिकांनी स्वपुढाकाराने आरोग्य तपासणी करावी : जिल्हाधिकारी प्रजित नायर
RELATED ARTICLES






