बलात्काराची व जीवे मारण्याचीही दिली धमकी
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील लाखेगाव येथील उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका श्रीदेवी प्रेमलाल उके (वय 38) यांना दोन जणांनी क्षुल्लक कारणावरून अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांचे कपडे फाडून विनयभंग केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी बलात्काराची व जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्या आरोग्य सेविकेला दिली.
आरोग्य सेविकेने तिरोडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवार २९ मे रोजी रात्री १२:०५ वाजता रितु अमीर चौधरी (वय २२) रा. सातोना ही गरोदर माता प्रसूती वेदना सुरु झाल्याने ती प्रसूतीकरिता उपकेन्द्रामध्ये दाखल होण्याकरिता आली. तिला गाडीतून खाली उतरविले व गरोदर मातेला उपकेंद्रामध्ये दाखल केले. गाडीमधून सामान उतरवायला तिचे नातेवाइक गाडीजवळ गेले असता तिथे नितीन मोहनलाल देशमुख (वय ३०) रा. लाखेगाव तिथे पोहोचला व गाडी इथे का ठेवली असे म्हणत त्यांना शिवीगाळ करू लागला. भांडण सोडवून त्यांना समजावण्याकरिता आरोग्य सेविका तिथे आली असता तिला अत्यंत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली. तितक्यात आरोपीचा भाऊ अश्विन मोहनलाल देशमुख (२६) तिथे पोहोचला. आरोग्य सेविकेचा मुलगा व पती तिला वाचवण्याकरिता तिथे आले असता दोन्ही आरोपींनी जातीवाचक शिव्या देत मारहाण केली. तसेच आरोग्य सेविकेचे कपडे फाडून बलात्काराची व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचे वडील जियालाल गोसाई देशमुख (५८) तिथे आले व त्यांनी या दोघांना प्रोत्साहित केले. तिरोडा पोलिसांनी भा.दं.वि.च्या कलम ३५३, ३५४, ३५४ ब, ३२३, २९८, ५०६, ५०९, ३४ व अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोग्य सेविकेचे कपडे फाडून विनयभंग व मारहाण
RELATED ARTICLES